शिक्रापूर पोलिसांची धडक कामगिरी ! दहा लाखांच्या चोरीचा आंध्र प्रदेशात छडा; २.९० लाखांची रोकड जप्त

Swarajyatimesnews

सीसीटीव्हीच्या धाग्यावरून शिक्रापूर पोलिसांची बिटरगुंट्यात कारवाई

 शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून दहा लाख रुपये चोरणाऱ्या चोरट्याचा शोध घेत शिक्रापूर पोलिसांनी थेट आंध्र प्रदेश गाठले. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे कारवाई करून पोलिसांनी चोरीच्या रकमेतील दोन लाख ९० हजार रुपये जप्त केले.

तळेगाव ढमढेरे येथील जेधेवस्तीवर राहणारे अतुल सुभाष जेधे (वय ४०) यांनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास आपली क्रेटा कार शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आतील दहा लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या घटनेनंतर जेधे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या धाग्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने दोन वेळा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे जाऊन तपास केला.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने कप्पराल टिप्पा, बोगल मंडल परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या तपासात रमेश बाबू गोडेट्टी याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याच्या घरी झडती घेतली असता चोरीच्या रकमेतील दोन लाख ९० हजार रुपये हस्तगत केले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेस कोळी, तुषार भोर, अंकुश कारंडे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, राम जाधव, मच्छींद्र निचीत, नागेश वाघमारे आणि भारत भोसले सहभागी झाले. गुन्ह्याचा पुढील तपास उमाकांत कुंजीर आणि भारत भोसले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!