कोरेगाव भिमात भटक्या कुत्र्याचा उच्छाद, ६ ते ७ कुत्र्यांसह किमान २५ जणांचा घेतला चावा

Swarajyatimesnews

लहान मुले, विद्यार्थी, प्रवासी अन् नागरिकांवर हल्ले; वढू रोडपासून,जगताप रस्त्यासह फडतरे वस्तीपर्यंत दहशत,ग्राम प्रशासन आणखी किती चाव्यांची वाट पाहणार?,

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिकांवर कुत्र्याने हल्ले करून चावा घेतल्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान २५ नागरिकांना, तसेच ६ ते ७ कुत्र्यांनाही चावा घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये लहान मुले, विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे.

या घटनांमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ रस्त्यावरील त्रास राहिला नसून तो थेट नागरिकांच्या जीविताच्या आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न बनला आहे.

तीन वर्षांच्या चिमुकलीवरही हल्ला – या घटनांमध्ये तीन वर्षांच्या श्रावणी महेश पवार या चिमुकलीला कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती आहे. घटनेनंतर पालकांनी तिला तातडीने स सून रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. आपल्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केल्याने पालकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

लहान मुलांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत असल्याने पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मुलांना शाळेत पाठवताना तसेच घराबाहेर खेळण्यासाठी सोडतानाही पालकांना आता विशेष काळजी घ्यावी लागत आहे.

वढू रोड ते फडतरे वस्तीपर्यंत दहशत – वढू रोड, पिंपळे जगताप रस्ता, फडतरे वस्ती रस्ता तसेच गावातील काही नागरी भागांत कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याची माहिती आहे. रस्त्याने जाणारे विद्यार्थी, कामगार, प्रवासी आणि स्थानिक नागरिक यांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.

काही नागरिकांना रस्त्यावरून जात असताना कुत्र्यांनी पाठलाग करून चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

कुत्रा पिसाळलेला होता का? संभ्रम कायम – कुत्रा पिसाळलेला होता किंवा त्याला रेबीजची लागण झाली होती, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत व विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र, वारंवार चाव्याच्या घटना लक्षात घेता संबंधित कुत्र्यांचा शोध घेऊन पशुवैद्यकीय तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांनी जखम किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष करू नये. जखम तातडीने साबण आणि वाहत्या पाण्याने स्वच्छ करून वैद्यकीय सल्ला घ्यावा. विशेषतः लहान मुलांना चावा लागल्यास पालकांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

ग्राम प्रशासन आणखी किती नागरिक जखमी होण्याची वाट पाहणार? – एकामागून एक नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत असताना कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीची भटक्या कुत्र्यांबाबतची प्रतिबंधात्मक यंत्रणा नेमकी कुठे आहे? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी, नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना याबाबत ग्रामपंचायतीकडून नियमितपणे कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.

कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यानंतरच कारवाई करण्याऐवजी त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? कुत्र्यांचे लसीकरण किती प्रमाणात झाले? भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांचे नियंत्रण याबाबत ग्रामपंचायतीकडे नेमकी कोणती यंत्रणा आहे? चावा घेतलेल्या नागरिकांची माहिती ग्रामपंचायतीने संकलित केली आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!