मलठणमध्ये मध्यरात्री घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण; चुलतीचेही दागिने लुटले!

Swarajyatimesnews

चार मुखवटाधारी चोरट्यांचा धुमाकूळ; सुमारे १ लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

उदयकांत ब्राम्हणे

शिरूर : शिरूर तालुक्यातील मलठण येथील दंडवतेदरा परिसरात मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या चुलतीला मारहाण करत सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली. ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नामदेव एकनाथ दंडवते (वय ४७, रा. दंडवतेदरा, मलठण) यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील एकनाथ ठकुजी दंडवते, आई यमुनाबाई दंडवते आणि चुलती लहानुबाई किसण दंडवते हे घरात झोपलेले असताना रात्री घराच्या कडीचा आवाज आला. त्यावेळी यमुनाबाईंनी दरवाजा उघडताच तोंड बांधलेले आणि जर्किन घातलेले तीन अनोळखी इसम घरात घुसले, तर त्यांचा चौथा साथीदार घराच्या ओट्यावर थांबला होता.

घरात घुसलेल्या हल्लेखोरांनी लाकडी काठी आणि कोयत्याच्या मुठीने तिघांनाही मारहाण केली. यावेळी यमुनाबाईंच्या उजव्या हाताच्या दंडावर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि उजव्या कानातील सोन्याचे फुल जबरदस्तीने ओढून नेण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कानालाही दुखापत झाली. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे १ लाख २८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर चारही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलिसांकडून तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक खटींग या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!