आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेसाठी धामारीकर सरसावले; ग्रामस्थ-शिक्षकांकडून देणगीचा वर्षाव!

Swarajyatimesnews

‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘मिशन ५३’ला लोकसहभागाचे बळ

उदयकांत ब्राम्हणे

धामारी (ता. शिरूर) : गावातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गावातच मिळावे, या उद्देशाने धामारीकरांनी शाळा विकासासाठी एकजूट दाखवली आहे. ‘घरापेक्षा शाळा सुंदर असावी’ हा विचार पुढे ठेवत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियान आणि मिशन ५३ ला ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकसहभागातून मॉडेल स्कूल उभारण्याच्या संकल्पाला आता आर्थिक मदतीचेही बळ मिळू लागले आहे.

दत्तात्रय वारे गुरुजी यांनी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून शाळेत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जाणार असल्याचे सांगितले. जानेवारीपर्यंत शाळेला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे, याच शाळेत शिक्षण घेऊन शिक्षक झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देत शाळेच्या विकासात योगदान दिले आहे. प्रत्येकाने केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर वेळ, श्रम आणि कौशल्याच्या माध्यमातूनही या उपक्रमात सहभागी व्हावे. गावातील शाळा सक्षम झाली तर ती हजारो पिढ्यांचे भविष्य घडवू शकते, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, अद्ययावत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करण्याचे ध्येय व्यक्त केले. प्रत्येक शाळेत एमपीएससी आणि यूपीएससी दर्जाची ग्रंथालये व वाचनालये उभारण्यासाठी स्वखर्चाने दीड लाख रुपये देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. तसेच दर्जेदार शिक्षण देत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शाळेतील शिक्षकांना इलेक्ट्रिक गाडी भेट देण्याचा मानस व्यक्त केला. शाळेच्या विकासात राजकारणाला स्थान नसून ही चळवळ लोकसहभागातून कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार माऊली कटके यांनी शिक्षण क्षेत्रात राजकारण न आणता ग्रामीण भागात सक्षम पिढी घडवण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये भीतीऐवजी आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते असावे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश वाबळे यांनी जिल्हा परिषद शाळांमध्येच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. वाबळेवाडीच्या धर्तीवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी योगदान द्यावे. यात्रा, सप्ताह, तमाशा, जत्रा आणि इतर सामाजिक खर्चातील काही निधी शिक्षणासाठी वापरल्यास गावाचे भविष्य बदलू शकते, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षकांकडून एक लाखांची मदत जाहीर! – ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियानाला शिक्षकांचा प्रत्यक्ष आर्थिक सहभागही लाभला असून शिक्षकांच्या वतीने शाळेच्या विकासासाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. याशिवाय माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे योगदान दिल्याने शाळेच्या विकासासाठी लोकसहभागातून निधी उभारणीला चालना मिळाली आहे.

गावातील मुलांच्या शिक्षणासाठी बाहेरगावी लाखो रुपये खर्च करण्याऐवजी गावातच आधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण करणे, हा धामारीकरांचा संकल्प आहे. शिक्षकांचे योगदान, ग्रामस्थांची एकजूट आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग यांच्या माध्यमातून ‘मिशन ५३’ला बळ मिळत असून धामारीची शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.यावेळी माजी सरपंच अंकुश शिवले, गावातील आजी-माजी पदाधिकारी, पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाराजी शैक्षणिक कामातून दूर केली! – “निवडणुकीपूर्वी प्रत्येक कार्यक्रमाला प्रफुल्ल शिवले आवर्जून उपस्थित असायचे; मात्र निवडणुकीनंतर ते दिसत नव्हते. त्यामुळे आमची थोडी नाराजी होती. पण आता शाळेच्या विकासासाठी त्यांनी सुरू केलेले काम पाहून ती नाराजीही दूर झाली!” अशी मिश्किल टिप्पणी माजी सरपंच सुभाष डफळ यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!