एका जिद्दी संकल्पनेतून ५३ शाळांच्या परिवर्तनाची मुहूर्तमेढ; प्रफुल्ल शिवले यांच्या ‘मिशन-५३’ची जिल्हा परिषदेकडून दखल!

Swarajyatimesnews

तीन महिन्यांत ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास; अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ ५३ शाळांना देणार भेटी; सर्वसाधारण सभेत अभियानाच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव

उदयकांत ब्राम्हणे

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक स्तरावरील शिक्षणाची संधी मिळावी, या ध्यासातून जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी पाबळ-केंदूर गटात सुरू केलेल्या ‘मिशन-५३’ची आता पुणे जिल्हा परिषदेनेही विशेष दखल घेतली आहे. एका-दोन नव्हे, तर तब्बल ५३ जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक चित्र बदलण्याचा संकल्प शिवले यांनी केला असून, त्यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर अभियाना’चे जिल्हा परिषदेच्या २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमुखी अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे स्वतः सर्व ५३ शाळांना भेटी देऊन या उपक्रमाची पाहणी करणार आहेत.

एका गटातील ५३ शाळा बदलण्याचा धाडसी संकल्प – सामान्यतः एखाद्या शाळेचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातात; मात्र पाबळ-केंदूर गटातील सर्व ५३ शाळांचा एकाच वेळी सर्वांगीण विकास करण्याचे आव्हान प्रफुल्ल शिवले यांनी स्वीकारले आहे. सुमारे चार हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडविणे, त्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. एका जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांचा एकत्रित विकास करण्याचा हा प्रयत्न राज्यासाठी आदर्श ठरू शकतो, अशी भूमिका सर्वसाधारण सभेत मांडण्यात आली. महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनीही शिवले यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रफुल्ल शिवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

केवळ इमारती नव्हे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत बदलाचे ध्येय – ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर अभियान’ केवळ शाळांच्या इमारती, रंगरंगोटी किंवा भौतिक सुविधांपुरते मर्यादित नाही. विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे, यावर अभियानाचा भर आहे. गटातील १५१ शिक्षकांना त्रिभाषिक शिक्षण, आर्थिक साक्षरता, योग, आत्मसंरक्षण, डिजिटल शिक्षण आणि जागतिक स्तरावर आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. जालिंदरनगर येथे शिक्षक प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला असून, शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशेने प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.

५३ शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार – या अभियानांतर्गत सर्व ५३ शाळांमध्ये सौरऊर्जा, वाय-फाय आणि इंटरॲक्टिव्ह पॅनेल यांसारख्या आधुनिक सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. चार केंद्रांसाठी एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्म, केंद्रप्रमुखांसाठी डॅशबोर्ड, डिजिटल स्वाक्षरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ई-मेल प्रणाली विकसित केली जात आहे. शिक्षकांचा प्रशासकीय कामातील वेळ कमी करून त्यांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना शिवले यांनी अभियानात समाविष्ट केली आहे.

तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्तीचा निर्धार – सत्काराला उत्तर देताना प्रफुल्ल शिवले यांनी निर्धारित तीन महिन्यांत अभियानाची उद्दिष्टे पूर्ण करून संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण जिल्हा परिषदेसमोर करणार असल्याचे सांगितले. या उपक्रमाला प्रशासकीय स्तरावर पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ स्वतः सर्व शाळांना भेटी देणार असल्याने अभियानाला प्रशासकीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे. एका संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आता प्रत्यक्ष शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असून, प्रफुल्ल शिवले यांच्या ‘मिशन-५३’कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रफुल्ल शिवले यांचा पुढाकार; चार हजार विद्यार्थ्यांसाठी नवी शैक्षणिक दिशा! – पाबळ-केंदूर गटातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना त्रिभाषिक शिक्षण, आर्थिक साक्षरता, आत्मसंरक्षण, डिजिटल ज्ञान आणि जागतिक स्तरावरील कौशल्ये देण्याचे उद्दिष्ट आहे. १५१ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यापासून ते ५३ शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उभारण्यापर्यंत अभियानाची व्याप्ती आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रफुल्ल शिवले यांचा हा प्रयत्न आहे.

आता जिल्हा परिषद पदाधिकारी थेट शाळांच्या दारात! – ‘मिशन-५३’च्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे पाबळ-केंदूर गटातील सर्व ५३ शाळांना भेटी देणार आहेत. त्यामुळे अभियानाच्या अंमलबजावणीला जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष सहकार्य मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!