सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासह पारदर्शक कारभार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणार
उदयकांत ब्राम्हणे
पुणे : ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या चळवळीत दीर्घकाळ सक्रिय राहून कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी मानद अध्यक्ष तथा खेडचे माजी सचिव रविंद्र चंद्रकांत गोसावी यांची पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी (व्हाईस चेअरमन) बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक कार्याचा आणि नेतृत्वाचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी संतोष लादे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी शरद ढोले, सचिवपदी श्रीकांत वाव्हळ, तर संचालकपदी रविंद्र गोसावी आणि सुदाम कड यांची निवड झाली होती. तज्ज्ञ संचालकपदी बालाजी सुरवसे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदासाठी रविंद्र चंद्रकांत गोसावी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे घटना समिती अध्यक्ष अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल घोळवे, सरचिटणीस संदीप ठवाळ, माजी अध्यक्ष बाळासाहेब मतकर, माजी सचिव मिलिंद काळे, खजिनदार अलका रहाणे, संघटक नवनाथ झोळ, राजाराम रासकर, नीलिमा जाधव, देवदत्त सांडभोर, पद्माकर डोंबाळे, संतोष निंबाळकर, तुकाराम शिंदे, विठ्ठल साकोरे, प्रदीप खिलारी, महेंद्र बेंगारे, विलास बडदे, निलेश पांडे, विनोद दुधाळ, शंकर ढोरे, संतोष डफळ, रविंद्र शिंदे, सोमनाथ घाडगे, अजित पलांडे, विकी पोळ, भाऊसाहेब शिरसाट आदी उपस्थित होते.
पतसंस्था ही सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणारी आणि परस्पर सहकार्याला बळ देणारी महत्त्वाची संस्था आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि सभासदांचा विश्वास जपणे ही पदाधिकाऱ्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे अनिल कुंभार यांनी सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकारी संस्थेच्या प्रगतीसाठी प्रभावी काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष अमोल घोळवे यांनीही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना श्रीकांत वाव्हळ यांच्या राज्यस्तरीय संघटनात्मक अनुभवाचा तसेच शरद ढोले आणि रविंद्र गोसावी यांच्या सहकार्याचा संस्थेच्या प्रगतीसाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
