शिरूर तालुक्यात महिलेची फसवणूक पितळेचे बिस्कीट देत केले तीन तोळे सोने लंपास!

Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांची बीडमध्ये कारवाई; साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

प्रतिनिधी राजाराम गायकवाड

शिक्रापूर (ता शिरूर) आधी गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन करायचा, त्यानंतर सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील दागिने लंपास करायचे आणि पोलिसांची नजर चुकवून बीडला पसार व्हायचे, अशी फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) या २८ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जात होत्या. शिक्रापूर येथील चाकण चौकात वाहनाची वाट पाहत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. गोड बोलत त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना सोबत येण्यास सांगितले.

त्यानंतर दरेकर यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळील झाडाखाली नेण्यात आले. तेथे बोलण्याच्या ओघात त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या कट करून तसेच गळ्यातील सोन्याची पानपोत काढून घेण्यात आली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या हातात सोन्यासारखे दिसणारे पितळेचे बिस्कीट ठेवून ते त्यांच्या सोन्यापेक्षा अधिक वजनाचे असल्याचे सांगितले आणि तेथून निघून गेला.

आरोपी गेल्यानंतर दरेकर यांनी बिस्कीट तपासले असता ते सोन्याचे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) व ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिस पथक बीड जिल्ह्यात पोहोचले. तेथे अभिमान तुपे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची पानपोत, असे तीन तोळे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत करण्यात आले आहेत.या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे व शिवाजी चितारे यांच्या पथकाने केली.

सीसीटीव्हीने आरोपीचा माग काढला – महिलेचा विश्वास संपादन करून तीन तोळे सोने लंपास केल्यानंतर आरोपी बीडला पसार झाला होता. मात्र, चाकण चौकापासून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिक्रापूर पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासाची दिशा निश्चित करून पोलिस पथकाने बीड गाठले आणि आरोपीला अटक केली. त्याच्याकडून महिलेचे तीन तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!