ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभा राहतोय आदर्श शिक्षणाचा पायंडा; रोटरीकडून ५ लाख ६ हजारांचा पहिला धनादेश सुपूर्द
उदयकांत ब्राम्हणे
पिंपळे जगताप (ता.शिरूर) सरकारी शाळेच्या विकासासाठी केवळ मदतीची अपेक्षा न ठेवता, ‘आमचा वाटा आम्ही आधी उचलतो, तुम्ही साथ द्या,’ असा विश्वास देत पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी शिक्षणाच्या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियानाला ग्रामस्थांनी आठ लाख रुपयांच्या लोकवर्गणीची साथ दिली असून, पुणे रोटरी क्लबने २२ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ३० लाख रुपयांचा ज्ञानयज्ञ सुरू झाला आहे.
पाबळ-केंदूर गटातील ‘मिशन-५३’ अंतर्गत पिंपळे-जगताप येथील शाळेचा कायापालट करण्यासाठी पुणे रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. पुण्यातील डेक्कन येथील पीवायसी हिंदू जिमखाना क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात रोटरीच्या अध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी पाच लाख सहा हजार रुपयांचा पहिला धनादेश ग्रामस्थांकडे सुपूर्द केला. जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या हस्ते मुख्याध्यापक सचिंद्र भारती, उमेश जगताप गुरुजी, हनुमंत टाकळकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बेंडभर यांनी हा धनादेश स्वीकारला.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनीही आर्थिक जबाबदारी स्वीकारली आहे. एकूण ३० लाख रुपयांच्या नियोजित निधीपैकी २२ लाख रुपये रोटरी क्लब देणार असून, उर्वरित आठ लाख रुपये गावकरी लोकवर्गणीतून उभारणार आहेत. त्यापैकी दोन लाख रुपये ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच प्रफुल्ल शिवले यांच्याकडे सुपूर्द केले, तर उर्वरित सहा लाख रुपये पुढील दोन महिन्यांत जमा करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे बाहेरून मदत मिळण्यापूर्वी गावाने स्वतःचा सहभाग निश्चित करून शाळेच्या विकासाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

या निधीतून शाळेत आधुनिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याबरोबरच कला, क्रीडा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात इंटरॅक्टिव्ह पॅनल, लॅपटॉप, संगीत साहित्य तसेच लाठी-काठीसारख्या पारंपरिक खेळांचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. शाळेच्या परिसरात वृक्षलागवडही करण्यात येणार असून, शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी विविध सुविधा उभारल्या जाणार आहेत.

प्रफुल्ल शिवले यांच्या पुढाकारातून रोटरी क्लब आणि ग्रामस्थांना एका व्यासपीठावर आणण्यात आले असून, शाळेच्या विकासाची कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील सहा महिन्यांत रोटरीकडून घोषित केलेला २२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाला रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले, असिस्टंट गव्हर्नर भरत हंल्दी, सचिव आसिम शेख, जालिंदरनगर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
