अवघ्या साडेसात मिनिटांत चोरट्यांनी फॉर्च्युनर केली होती लंपास! पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या पाठपुराव्याला यश!
उदयकांत ब्राम्हणे
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) अवघ्या साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर चोरून चोरटे पसार झाले; मात्र वर्षभरानंतर त्याच फॉर्च्युनरचा ठावठिकाणा थेट आंध्र प्रदेशात लागला! कोरेगाव भीमा येथील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची चोरीला गेलेली टोयोटा फॉर्च्युनर शोधून काढण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, गाडी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाला आंध्र प्रदेशात तब्बल पाच दिवस मुक्काम करावा लागला. या काळात कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आंध्र प्रदेशातील पोलीस आयुक्तांशी (CP) सातत्याने संवाद साधला. तर पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनीही संबंधित CP यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर फॉर्च्युनर तातडीने सोडण्यात आली.

अवघ्या साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर लंपास! – १६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या यशराज टॉवर परिसरातून संदीप ढेरंगे यांची MH 12 TH 9955 क्रमांकाची टोयोटा फॉर्च्युनर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. विशेष म्हणजे, चोरट्यांनी अवघ्या साडेसात मिनिटांत ही गाडी लंपास केली होती. या संपूर्ण घटनेची परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नोंद झाली होती. फुटेजमध्ये दोन ते तीन संशयित व्यक्ती किया कारमधून परिसरात आल्याचे दिसून आले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वाहन चोरी करून चोरटे पसार झाले होते.
या प्रकरणी संदीप ढेरंगे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू होता. अखेर तपासादरम्यान चोरीला गेलेली फॉर्च्युनर आंध्र प्रदेश राज्यात आढळून आली.
आंध्र प्रदेशात पाच दिवस मुक्काम; वरिष्ठांचा थेट हस्तक्षेप! – चोरीची फॉर्च्युनर ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार अजित इंगवले, पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे आणि माजी सरपंच संदीप ढेरंगे आंध्र प्रदेशात रवाना झाले. मात्र, वाहन परत मिळवण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने पाच दिवस तेथेच थांबावे लागले.
ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि वाहन तातडीने सोडण्यात यावे, यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आंध्र प्रदेशातील संबंधित CP यांच्याशी संवाद साधत आग्रही विनंती केली. यानंतर पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनीही संबंधित CP यांच्याशी थेट संवाद साधून प्रकरणाचा पाठपुरावा केला. दोन्ही राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि अखेर फॉर्च्युनर तातडीने सोडण्यात आली.

चोरीला गेलेली गाडी पुन्हा मालकाच्या ताब्यात! – अवघ्या साडेसात मिनिटांत चोरीला गेलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर आंध्र प्रदेशातून शोधून काढण्यात आली. शिक्रापूर पोलिसांचा तपास, पाच दिवसांचा आंध्र प्रदेशातील मुक्काम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रभावी पाठपुरावा यामुळे संदीप ढेरंगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चोरीला गेलेली आपलीच फॉर्च्युनर पुन्हा मिळाल्याने ढेरंगे कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
साडेसात मिनिटांत चोरी, वर्षभरानंतर शोध आणि पाच दिवसांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर फॉर्च्युनर पुन्हा मालकाच्या ताब्यात! शिक्रापूर पोलिसांच्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.
