कारेगावच्या साईनगरमध्ये पहाटे थरार; दुचाकीवरून आलेल्या दोघांचा हल्ला, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध
उदयकांत ब्राम्हणे
कारेगाव (ता. शिरूर) येथील साईनगर परिसरात पाण्याच्या छोटेखानी फिल्टर प्लॅण्टवर काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोर दुचाकीवरून आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
हामजा उस्मान शेख (वय ३९, रा. कारेगाव, मूळ रा. धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते विकास माधवराव नवले यांच्या ‘समु एंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाण्याच्या प्रकल्पावर गेल्या सहा महिन्यांपासून काम करीत होते. पत्नी व दोन मुलांसह ते प्लॅण्टलगतच्या इमारतीत राहत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी सव्वासहाच्या सुमारास हामजा प्लॅण्टमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करण्यासाठी गेले होते. काही वेळाने ते प्लॅण्टमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला घसरून पडल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, घटनास्थळी बंदुकीचे रिकामे काडतूस आढळल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. मृतदेहाची तपासणी केली असता डोक्याला आरपार छिद्र असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्लॅण्टसमोर दुचाकी थांबविल्याचे आणि मागे बसलेल्या व्यक्तीने प्लॅण्टच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन हामजा यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक संदीपसिंग गिल, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पाण्याच्या प्लॅण्टमध्ये काम करणाऱ्या कामगारावरील हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असल्याचे संदीपसिंग गिल यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे पुढील तपास करीत आहेत.
कारेगावातील मध्यवस्तीत झालेल्या या गोळीबाराचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने परीसरात उलट – सुलट चर्चांना उत आला. गोळीबारात मृत्युमूखी पडलेले हामजा शेख हे सद्वर्तनी गृहस्थ होते, त्यामुळे त्यांचा अशा प्रकारे खून होऊ शकत नाही, असे त्यांचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी सांगितल्याने पोलिसही काही काळ चक्रावून गेले. सुपारी देऊन ही हत्या घडविली असल्याचा आरोप करताना नेमके हामजा शेख यांनाच हल्लेखोरांना मारायचे होते की अन्य कुणाला, याबाबतही शेजाऱ्या पाजाऱ्यांनी साशंकता व्यक्त केल्याने या गंभीर घटनेतील गुढ वाढले आहे.
