दोन बळी गेल्यानंतर प्रशासन जागे! शिरूर बायपासवरील धोकादायक दुभाजक अखेर बंद

Swarajyatimesnews

हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचे पक्के बांधकाम सुरू; पोलिसांकडून ३८ बॅरिकेड्स उभारणी — सुरक्षित पर्यायी मार्गाचीही गरज

संपादक उदयकांत ब्राम्हणे

शिरूर प्रतिनिधी : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बायपासवर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांना आता वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल संग्रामसमोर झालेल्या भीषण अपघातात किशोर यादव आणि प्रथमेश लाड यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने धोकादायक ठिकाणांवर कारवाई सुरू केली आहे. हॉटेल संग्रामसमोरील फोडण्यात आलेला दुभाजक कायमस्वरूपी बंद करण्याचे पक्के बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले असून, शिरूर पोलिसांनी धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडला जाणाऱ्या विविध ठिकाणी तब्बल ३८ बॅरिकेड्स उभारले आहेत.

हॉटेल संग्रामसमोरील दुभाजक यापूर्वी बंद करण्यात आला होता. मात्र, काही दिवसांनी तो फोडून वाहनांना रस्ता ओलांडण्यासाठी अनधिकृत मार्ग तयार करण्यात आला. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच अन्य वाहने वेगाने ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. बायपासवरून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे हे क्रॉसिंग विशेषतः धोकादायक ठरत होते.

याच ठिकाणी यापूर्वीही गंभीर अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात शिरूरमधील एका युवकाला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात किशोर यादव आणि प्रथमेश लाड यांचा मृत्यू झाल्यानंतर दुभाजक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचे पक्के बांधकाम सुरू केले आहे. त्याचबरोबर शिरूर पोलिसांनी बायपासवरील धोकादायक क्रॉसिंगची पाहणी करून विविध ठिकाणी ३८ बॅरिकेड्स उभारले आहेत. कोळपे हॉस्पिटलसमोर तसेच अन्य धोकादायक ठिकाणीही बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

एका ठिकाणचा धोका बंद; दुसरीकडे वाहतुकीचा ताण – धोकादायक क्रॉसिंग बंद केल्यानंतर बाबुरावनगरकडे जाणारी अनेक वाहने सी. टी. बोरा कॉलेजजवळील उड्डाणपुलाखालून जाऊ लागली. त्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्त्यावर अचानक वाहनांची संख्या वाढून काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे एका ठिकाणचा अपघाताचा धोका कमी करताना वाहतुकीचा ताण दुसऱ्या मार्गावर वाढत असल्याचे चित्र आहे.

काही वर्षांपूर्वी दुचाकीस्वार आणि छोट्या चारचाकी वाहनांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी हॉटेल पल्लवीसमोरील पुलाखालून शिरूरच्या दिशेने जाण्यासाठी अंडरपासची सुविधा करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात ओढ्याचे आणि पावसाचे पाणी अंडरपासमध्ये शिरल्याने हा मार्ग बंद पडला. हा सुरक्षित पर्यायी मार्ग पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अंडरपासमध्ये पाणी साचू नये यासाठी प्रभावी पाणी निचरा व्यवस्था, पंपिंग व्यवस्था किंवा अन्य तांत्रिक उपाययोजना केल्यास हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी उपयोगात आणता येऊ शकतो. त्यामुळे बायपासवरील अनधिकृत क्रॉसिंगवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.

केवळ बॅरिकेड्स पुरेसे नाहीत – शिरूर बायपासवर वेगाने धावणारी वाहने, अनधिकृत क्रॉसिंग, सुरक्षित पर्यायी मार्गांचा अभाव आणि वाढता वाहतुकीचा ताण यामुळे काही ठिकाणे सातत्याने अपघातप्रवण ठरत आहेत. त्यामुळे केवळ दुभाजक बंद करणे आणि बॅरिकेड्स लावणे ही तात्पुरती उपाययोजना असून, संपूर्ण बायपासच्या वाहतूक सुरक्षेचा सर्वंकष आराखडा तयार करण्याची गरज आहे.

अपघातप्रवण ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून आवश्यक ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करणे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, वेग नियंत्रणाची साधने आणि संरक्षक कठडे उभारणे आवश्यक आहे. शहरातून बायपासकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही सुरक्षित आणि नियोजित पर्यायी मार्ग विकसित करणे गरजेचे आहे.

‘जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे का होते?’ – दोन निष्पापांचे जीव गेल्यानंतर सुरू झालेली कारवाई स्वागतार्ह असली, तरी ‘अपघात झाल्यानंतरच प्रशासन का जागे होते? जीव गेल्यानंतरच उपाययोजना का केल्या जातात?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

हॉटेल संग्रामसमोरील दुभाजक पुन्हा उघडला जाणार नाही, तसेच बायपासवरील इतर धोकादायक क्रॉसिंगवरही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने दीर्घकालीन वाहतूक सुरक्षा आराखडा तयार केल्यास भविष्यातील अनेक अपघात टाळता येऊ शकतात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!