दोन दिवसांच्या अथक शोधानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हाती; आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश

Swarajyatimesnews

संपादक उदयकांत ब्राम्हणे 

उरळगाव : विद्युत मोटारीची केबल जोडण्यासाठी गेलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना ९ ऑगस्ट रोजी उरळगाव येथे घडली होती. या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर मंगळवारी (ता. ११) यश आले. आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने अथक प्रयत्न करून संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

घटनेची माहिती मिळताच लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम राबविताना पथकासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या.

मात्र, या अडचणींवर मात करत पथकातील जवानांनी नदीपात्रातील विविध ठिकाणी सातत्याने शोध घेतला. सलग दोन दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर शेतकऱ्याचा मृतदेह पथकाच्या हाती लागला.पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिस प्रशासनाच्या ताब्यात दिला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला.या दुर्दैवी घटनेमुळे उरळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संकटाच्या काळात तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन दिवस सातत्याने शोधमोहीम राबविणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!