शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपींना पकडले
उदयकांत ब्राम्हणे
शिरूर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची हत्या करण्यात आली होती. या गंभीर हत्याकांडाचा तपास करत शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या ४८ तासांत तिन्ही संशयित आरोपींना सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून जेरबंद केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित रविंद्र सोनवणे (वय २४, रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३) आणि आदित्य दादाभाऊ पवार (वय १९, दोघेही रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी गंगावणे यांच्याकडून दोन लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर झालेल्या वादातून रोहित सोनवणे याने जवळील पिस्तुलातून गंगावणे यांच्या कानाच्या मागील बाजूस गोळी झाडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तिन्ही आरोपी सुपा टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि डी.बी. पथकाने तेथे सापळा रचून रोहित सोनवणे, अनिकेत गव्हाणे आणि आदित्य पवार यांना ताब्यात घेतले.
आरोपींविरुद्ध यापूर्वीही बेकायदा गावठी पिस्तुल बाळगणे, मारहाण आणि जबरी चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन केनेकर करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार सोने, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाण्याच्या डी.बी. पथकाने केली.
