गुन्हे, अपघात व बेवारस स्थितीत सापडलेल्या वाहनांचा शोध; मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधि राजाराम गायकवाड
शिक्रापूर (ता.शिरूर) गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत सापडून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात दीर्घकाळ पडून असलेल्या वाहनांपैकी ३२ दुचाकींचा शोध घेऊन त्या त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १३ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील वाहनांचे आरटीओ क्रमांक, चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास करण्यात आला. त्यातून संबंधित वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कागदपत्रे व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १० सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने ३२ वाहने संबंधितांच्या ताब्यात देण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून वाहनांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार नवनाथ नाईकडे व अक्षदा पानमंद यांनी केली.
दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात अद्याप काही वाहने पडून आहेत. संबंधित वाहनांच्या मूळ मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिक्रापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे. मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणीही पुढे न आल्यास नियमानुसार ही वाहने बेवारस घोषित करून शासनस्तरावर कायदेशीर प्रक्रिया व त्यानंतर लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
