गंभीर मारहाण प्रकरणात मुख्य आरोपीला अटकपूर्व जामीन

Swarajyatimesnews

गवडगाव मावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश ,ॲड. नकुल शहाणे यांचा प्रभावी युक्तिवाद

वडगाव मावळ : रावेत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणात अटक होण्याची शक्यता असलेल्या मुख्य आरोपीला वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा आदेश दिला.या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीवर गंभीर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने ॲड. नकुल नंदकुमार शहाणे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. नकुल शहाणे यांनी आरोपीला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीकडून कोणतीही महत्त्वाची वस्तू अथवा पुरावा जप्त करावयाचा नसून, त्यामुळे त्याची कोठडीतील चौकशी आवश्यक नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.तसेच आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून त्याचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.

तपासाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याने आरोपीला अटक करून कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा मुद्दाही बचाव पक्षाने मांडला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तसेच प्रकरणातील कागदपत्रांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीस ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच तेवढ्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या मुचलक्यावर जामीन देण्यात आला.या प्रकरणात ॲड. राहुल देठे, ॲड. निनाद ढोरे आणि ॲड. मयूर शेलार यांनी सहकार्य केले.न्यायालयाच्या या आदेशामुळे गंभीर आरोप असलेल्या प्रकरणातही तपासाच्या टप्प्यावर आरोपीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करून अटकपूर्व जामिनाचा कायदेशीर मार्ग उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!