प्रेमसंबंध, चोरीचा संशय अन् सूड… पिंपळे जगताप खुनामागचे धक्कादायक सत्य समोर

Swarajyatimesnews

पाझर तलावातील मृतदेहाचे गूढ उकलले; बिहारच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड 

 दि. २० जुलै  : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून, प्रेमसंबंध, शेतातील वीजपंप चोरीचा संशय आणि त्यातून निर्माण झालेल्या सूडाच्या भावनेतून बिहारच्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत तिघा आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.

१७ जुलै रोजी पिंपळे जगताप येथील पाझर तलावात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचे शवविच्छेदन आणि प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप झाल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मृताचे कपडे, छायाचित्रे आणि इतर माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली. त्याचबरोबर बेपत्ता व्यक्तींची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी एल अँड टी फाटा परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे मृताच्या नातेवाईकांपर्यंत पोलिसांना पोहोचवले. त्यानंतर मृताची ओळख टुटुकुमार अजीत यादव (वय २२, मूळ रा. जेहानाबाद, बिहार) अशी पटली.

त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे पुष्करकुमार अरुण यादव, आयुष्मान सुशील पांडे आणि सचिन मारुती हिंगेवार यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजपंप चोरी केल्याचा संशय मृतावर व्यक्त करण्यात आला होता. या घटनेमुळे आरोपीचे आर्थिक नुकसान झाले होते. त्याचबरोबर आरोपीच्या बहिणीच्या प्रेमसंबंधांना मृताकडून मिळणारी साथ आणि सोशल मीडियावरील फोटो व स्टोरी यामुळे आरोपीच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला होता. या सर्व कारणांचा राग मनात धरून आरोपींनी नियोजनपूर्वक टुटुकुमार यादव याची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाझर तलावात फेकून दिला.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!