कोरेगाव भिमा येथे चोरट्यांनी ४.२५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

 शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फिर्यादी किरण पंडित ढेरंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह दहाव्याच्या विधीसाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे व लॉकर फोडून पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, दोन तोळ्यांची सोन्याची पोत तसेच रोख रक्कम असा एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरी परतल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि कपाटे उघडी असल्याचे दिसून आले. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वानपथक व तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून संशयितांची माहिती गोळा केली जात आहे. वारंवार होत असलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गुपचे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!