धक्कादायक! पिंपळे जगतापच्या पाझर तलावात तरुणाचा गळा आवळून खून करून मृतदेह पाण्यात फेकला पाण्यात

Swarajyatimesnews

पुणे जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर , पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह विविध तपास पथकांची भेट

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात मृताच्या गळ्यावर गंभीर जखमा आढळल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी (दि. १७) दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास पिंपळे जगताप येथील पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांना गावातील पाझर तलावात एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

तलावाच्या पश्चिम बाजूस पालथ्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून पाहणी केली असता मृताच्या गळ्यावर खोल जखम, तसेच चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा आढळल्या. त्यामुळे हा अपघात किंवा बुडून मृत्यू नसून नियोजनबद्ध खून असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, शिरूर पोलीस, तांत्रिक विश्लेषण पथक आणि इतर तपास यंत्रणांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. मृताची ओळख पटविणे, खुनामागील कारण शोधणे आणि आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

या थरारक घटनेमुळे पिंपळे जगताप व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!