८० हजारांची ८०० किलो ‘सुपर भगवा’ डाळिंबे लंपास; शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत डाळिंब बागेवर धाडसी डल्ला मारत तब्बल ८०० किलो ‘सुपर भगवा’ जातीची डाळिंबे लंपास केली. या चोरीमुळे शेतकरी राजाराम भानुदास ओव्हाळ यांना सुमारे ८० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम ओव्हाळ (वय ४२, रा. शिंदोडी, ता. शिरूर) यांच्या गट क्रमांक १०६/२ मधील डाळिंब बागेत ही चोरी झाली. १३ जुलै रोजी रात्री ८.३० ते १४ जुलै रोजी सकाळी ७ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बागेत प्रवेश करून काढणीसाठी तयार असलेली उच्च दर्जाची ‘सुपर भगवा’ डाळिंबे पळवून नेली.
घटनेची माहिती मिळताच राजाराम ओव्हाळ यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत. गुन्ह्याची नोंद सहायक फौजदार चव्हाण यांनी केली असून, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
दरम्यान, शेतमाल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी शेती परिसरात अधिक प्रभावी पोलीस गस्त घालण्याची मागणी होत आहे.,
