धक्कादायक ! निमगाव म्हाळुंगी येथे व्यसनाधीन मुलाने केला जन्मदात्या आईचा खून

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

“आई” हा शब्द मायेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा मानला जातो. मात्र शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने जन्मदात्या आईलाच बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदा रामोबा चौधरी (वय ६०, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे भाऊ भास्कर दशरथ कबाडी (रा. कबाडवाडी, ता. जुन्नर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीनुसार, १४ जुलै रोजी सायंकाळी कुंदा चौधरी यांचा मुलगा दिलीप रामोबा चौधरी याने हाताने तसेच कठीण वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी दिलीप रामोबा चौधरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी करत आहेत.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुलगा व्यसनाधीन असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र या संदर्भातील वस्तुस्थितीचा तपास पोलीस करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

जन्मदात्या आईचाच जीव मुलाच्या हातून गेल्याच्या या घटनेमुळे निमगाव म्हाळुंगी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!