शिक्रापूर पोलिसांची साऊंड-लाईट चालकांना सक्त ताकीद; नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा
राजाराम गायकवाड
दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवातील ध्वनी आणि प्रकाशाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. कर्णकर्कश आवाज करणारे प्रेशर साऊंड, प्लाझ्मा तसेच डोळ्यांना अपायकारक ठरणारे लेझर आणि हायबीम शार्पी लाईट वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉल्बी, डिजिटल साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट चालक-मालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः दोन डॉल्बी किंवा डिजिटल साऊंड सिस्टीम समोरासमोर उभ्या करून ‘साऊंड कॉम्पिटिशन’च्या नावाखाली आवाजाची पातळी वाढवू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना त्रास होण्याबरोबरच परिसरातील शांतता भंग होऊन वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्सवाचा आनंद इतर नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरू नये, याची दक्षता मंडळांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, लेझर आणि हायबीम शार्पी लाईटचा थेट प्रकाश वाहनचालकांच्या डोळ्यांवर पडल्यास दृष्टी बाधित होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकाशयंत्रांचा बेफाम वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने ध्वनी प्रदूषणाबाबत वेळोवेळी जारी केलेले नियम व निर्देश पाळणे संबंधित मंडळे आणि साऊंड-लाईट चालकांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित चालक-मालकांसह नियमभंग करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार थेट कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.
