शिक्रापूर परिसरात दुचाकी चोराला अटक,4 मोटारसायकली जप्त, 14 गुन्हे उघडकीस

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत जोरदार चाप बसवला आहे. तब्बल १४ गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Crime News)

योगेश ज्ञानेश्वर जाधव (वय २७, रा. कासारीफाटा, शिक्रापूर; मूळ रा. लोणीधामणी, ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज युवराज टेमगिरे (रा. बुरुजवाडी, मलठण रोड, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आपली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (एम.एच.१२ एफव्ही-०६३२) अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परिसरात वाढलेल्या चोऱ्यांची दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी संशयित योगेश जाधव याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने शिक्रापूरसह इतरही अनेक ठिकाणहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. न्यायालयाने मंजूर केलेल्या पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या ४ मोटारसायकली हस्तगत केल्या. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडून आणखीही काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणेने व्यक्त केली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार  यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!