जुन्नर-आंबेगावातील १५० शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद, १२ गुन्हे उघड, चोरीचा मुद्देमाल जप्त
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल वायर चोरी करून तब्बल १५० शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी पडलेल्या बिडीच्या थोटकांपासून, विशिष्ट प्रकारच्या तंबाखूच्या पुडी आणि शीतपेयाच्या बाटल्यांपासून तपासाला दिशा मिळाली आणि त्यातून मध्य प्रदेशातील पाच सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.(Crime News)
गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर, नारायणगाव, ओतूर, पारगाव आणि आंबेगाव परिसरात नदीपात्रातील शेतीपंपांच्या केबल वायर चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या चोरीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले होते. उन्हाळ्यात सिंचन व्यवस्था विस्कळीत झाल्याने शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले.(Crime News)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्येक घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास केला. तपासादरम्यान घटनास्थळी आढळलेली बिडीची थोटके, विशिष्ट प्रकारची तंबाखूची पुडी आणि पेयाच्या बाटल्या स्थानिक परिसरात सहज उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याच छोट्या पुराव्यांमुळे तपासाची दिशा बदलली आणि चोरी करणारी टोळी परराज्यातील असल्याचा संशय बळावला.(Crime News)
गोपनीय माहितीदारांच्या मदतीने ही टोळी मध्य प्रदेशातील असून चोऱ्यांसाठी महाराष्ट्रातील विविध भागात फिरस्ते म्हणून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरी) परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरज्या छत्तेसिंग पवार (१९), गगन शापिलाल चौहान (१९), अतुल शापिलाल चौहान (२१), तपसलाल सर्कस पवार (५०) आणि सुरज रामसर आदिवासी (४०) या पाच आरोपींना अटक केली.(Crime News)
चौकशीदरम्यान आरोपींनी जुन्नर व आंबेगाव परिसरातील केबल चोरीचे गुन्हे कबूल केले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या केबल वायर जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे केबल चोरीचे तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले असून १५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Crime News)
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.(Crime News)
