कंटेनरच्या धडकेत एंडेव्हर उलटली; बसच्या धडकेत जागीच मृत्यू तर कंटेनर चालक पसार
संपादक उदयकांत ब्राम्हणे
शिरूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ पाषाण मळा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात तरुण उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. यु-टर्न घेत असलेल्या फोर्ड एंडेव्हरला भरधाव कंटेनरने मागून दिलेली धडक, त्यानंतर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या शिवाई बसला झालेली धडक, असा हा थरारक अपघात घडला. या अपघाताचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे.(Shirur Accident)
या अपघातात वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील उद्योजक किशोर नामदेव यादव (३८) आणि प्रथमेश प्रकाश लाड (३०, रा. सुंदर सृष्टी, शिरूर; मूळ रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला.(PuneAccident)
किशोर यादव हे एंडेव्हर मोटारीने (एमएच १२ एसयू ५५८९) शिरूरहून वाडेगव्हाणकडे निघाले होते. संग्राम हॉटेलसमोरून यु-टर्न घेत असताना दुभाजकाजवळ त्यांचा वाहनाचा वेग कमी झाला. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या कंटेनरने एंडेव्हरला जोरदार धडक दिली. धडकेच्या जोराने एंडेव्हर दुचाकीला धडकून विरुद्ध दिशेला गेली.(PuneAccident)
याचवेळी छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या शिवाई बसने (एमएच ४९ बीझेड ८०६०) एंडेव्हर आणि दुचाकीला धडक दिली. या तिहेरी धडकेत एंडेव्हरच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. किशोर यादव यांचा मोटारीतच मृत्यू झाला, तर एंडेव्हर आणि बसच्या मध्ये सापडल्याने प्रथमेश लाड यांचा जागीच मृत्यू झाला.(Kishor Yadav Accident)
अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. चार वाहनांच्या या भीषण धडकेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघाताची माहिती मिळताच शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील आणि उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.(PuneAccident)
किशोर यादव यांच्या निधनाने वाडेगव्हाण-पारनेर परिसरात हळहळ – अपघातात मृत्यू झालेले किशोर यादव हे वाडेगव्हाणच्या सरपंच प्रियांका यादव यांचे पती असून पारनेर तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा संपर्क होता. ते खासदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय आणि जिवलग मित्र असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मित्रपरिवार आणि समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.(PuneAccident)
दरम्यान, प्रथमेश लाड हे आयटी कंपनीत कार्यरत असून शिरूरमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या मृत्यूनेही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध सुरू असून, शिरूर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे.(PuneAccident)
