स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
दि. २७ जून , राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री प्रवाशाला रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेल्यानंतर मारहाण करून मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला त्याच्या अल्पवयीन साथीदारासह शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत लुटलेला मोबाईलही हस्तगत केला आहे.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी रोहीदास बाबासाहेब दराडे (वय ४०, रा. हातोला, ता. आष्टी, जि. बीड) हे सणसवाडी चौक येथे प्रवासी वाहनाची प्रतीक्षा करत उभे असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना रिक्षातून पुढे सोडण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन करून त्यांना निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मोहन भगवान मेचे (वय २२, रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) याला ताब्यात घेण्यात आले.
कसून चौकशीदरम्यान त्याने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून लुटलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपी आणि त्याच्या साथीदाराने परिसरात यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दामोदर होळकर करीत असून तो पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे तसेच पोलीस हवालदार रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, बापू हडागळे, दामोदर होळकर, नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने केली.
