हातात विळा, तोंडाला स्कार्फ, अंगात शर्ट… जीवाच्या आकांताने टाहो फोडत मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या शेतकरी महिलेचा सरकारला आर्त सवाल – “आता आमच्या गळ्यातही कुत्र्यासारखा काटेरी पट्टा बांधूनच शेती करायची का?”
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
काळ्या आईची सेवा करताना आता शेतकरी महिलांनी पिकाची काळजी घ्यायची की स्वतःच्या जीवाची? हा काळजाला भिडणारा प्रश्न शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात घडलेल्या थरारक घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. गुरुवारी सायंकाळी उसाच्या फडात गवत काढत असलेल्या लिलाबाई बाळासाहेब फराटे यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. क्षणाचाही विलंब न करता त्या खाली वाकल्या, हातातील विळा बिबट्याच्या दिशेने उगारला आणि जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत इंच-इंच मागे सरकत राहिल्या. काही सेकंदांचा हा थरार म्हणजे मृत्यूच्या दाढेतून स्वतःला हिसकावून आणण्याचा संघर्षच होता.
सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास लिलाबाई आपल्या शेतात गवत काढत होत्या. तोंडाला स्कार्फ, अंगात जाड शर्ट आणि हातात विळा होता. अचानक उसाच्या दाट फडातून बिबट्या समोर आला आणि झेप घेतली. लिलाबाईंनी प्रसंगावधान राखत क्षणार्धात खाली वाकून स्वतःला सावरले. त्यामुळे बिबट्याची झडप थोडक्यात चुकली. त्याचवेळी त्यांनी हातातील विळा बिबट्याच्या दिशेने उगारत जीवाच्या आकांताने टाहो फोडला. त्यांचा आरडाओरडा ऐकून बिबट्या काही क्षण जागेवरच थांबला. लिलाबाई हळूहळू मागे सरकत घराच्या दिशेने निघाल्या. त्या प्रत्येक पावलागणिक मृत्यूला मागे टाकत होत्या. अखेर त्या सुखरूप घरी पोहोचल्या; पण मनातील भीती आजही कायम आहे.
या घटनेनंतर गोकुळनगर परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी, शेतमजूर आणि विशेषतः महिला आता सायंकाळनंतर शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले असले, तरी ग्रामस्थांनी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शेतकरी आधीच पिकाला भाव, वीज, खत, पाणी आणि निसर्गाच्या संकटांशी झुंज देत आहे. त्यात आता शेतात मृत्यू दबा धरून बसला आहे. शेतकऱ्याने शेती करायची की स्वतःचा जीव वाचवायचा? असा सवाल या घटनेने उपस्थित केला आहे.
मरण डोळ्यांसमोर उभं होतं…
हातात विळा नसता तर आज मी जिवंत नसते. बिबट्या माझ्यासमोर झेपावला तेव्हा खाली वाल्याने हल्ला चुकला. जीवाच्या भीतीने विळा त्याच्या दिशेने उगारला आणि जीव तोडून ओरडत राहिले. तो माझ्याकडे पाहत उभा होता. त्या क्षणी मरण डोळ्यांसमोर दिसत होतं. इंच इंच मागे सरकत सरकत घर गाठले.रानात जायला आता भीती वाटते. पण शेती सोडून जगायचं कसं? पोटासाठी पुन्हा त्याच रानात जावंच लागणार. आता आम्ही शेतकरी महिलांनीही गळ्यात कुत्र्यासारखे काटेरी पट्टे घालून शेती करायची का? मायबाप सरकार, आमच्या जीवाचीही किंमत आहे… आमच्यावर दया करा.-लिलाबाई बाळासाहेब फराटे, शेतकरी महिला

