कामाची पावती मतपेटीतून! रमेश जासूद यांचे शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेवर निर्विवाद वर्चस्व
संपादक उदयकांत ब्राम्हणे
“अडचणीच्या वेळी सर्वप्रथम धावून येणारा सहकारी” अशी ओळख असलेले रमेश संभाजी जासूद यांच्यावर शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली. शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ४८ मते मिळवत अध्यक्षपदावर दिमाखदार विजय संपादन करत त्यांनी संघटनेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
या निवडणुकीत तालुक्यातील ७६ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रमेश संभाजी जासूद यांना ४८ मते, तर प्रतिस्पर्धी रविंद्र गोसावी यांना २८ मते मिळाली. त्यामुळे जासूद यांनी २० मतांच्या फरकाने विजय मिळविला. सचिवपदाच्या निवडणुकीत शांतराम पांडुरंग पाडळे यांना ५२ मते, तर संतोष डफळ यांना २४ मते मिळाली. त्यामुळे पाडळे यांनी २८ मतांच्या फरकाने सचिवपद पटकावले.
यासह शिरूर तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी दिनेश निवृत्ती पलांडे, महिला उपाध्यक्षपदी सारिका झुंबरराव दरेकर, कार्याध्यक्षपदी आरती बापुसो आढाव (गव्हाणे), कोषाध्यक्षपदी निलेश भगवान लोंढे, प्रसिद्धी प्रमुखपदी बाळू दादाभाऊ बेंद्रे, महिला सदस्यपदी पूनम विलास थोरात, तर सदस्य म्हणून शैलजा भगवान कुंदळे, राजाराम मोहन मुकुटे, विशाल श्रीहरी नाईकनवरे आणि सोमनाथ किसन घाडगे यांची बिनविरोध निवड झाली.

रमेश जासूद यांचा विजय हा केवळ मतांचा विजय नसून, सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याला दिलेली विश्वासाची पावती मानली जात आहे. ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी सहकाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला. संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, मानसिक आधार देणे, सर्वांना सोबत घेऊन चालणे आणि निरपेक्ष सेवाभाव जपणे, ही त्यांची कार्यशैली विशेष लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळेच ते ‘हक्काचा आपला माणूस’ म्हणून ओळखले जातात.
शासकीय सेवेसोबतच प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी उद्योजक म्हणूनही रमेश जासूद यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत महिला ग्रामपंचायत अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर भरभरून विश्वास व्यक्त केला.
सचिवपदी निवड झालेले शांतराम पांडुरंग पाडळे यांनी २०१३ पासून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची मतदारांनी दखल घेतली. तर उपाध्यक्ष दिनेश निवृत्ती पलांडे हे सर्वांना समजून घेणारे, प्रभावी संवाद साधणारे आणि शांततापूर्ण मार्गाने समस्या सोडविणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे, सेवाविषयक अडचणींना न्याय मिळवून देणे आणि संघटना अधिक सक्षम करण्यासाठी नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पंचायत समितीसमोरील दत्त मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात ही निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सरचिटणीस अनिल बगाटे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, हवेलीचे माजी तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड आणि हवेलीच्या माजी सचिव सविता भुजबळ यांनी जबाबदारी पार पाडली.
निवडणूक झाली विचारांची… मैत्री मात्र कायम! निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप, कटुता आणि वैयक्तिक टीका हे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची निवडणूक याला सुखद अपवाद ठरली. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी वैयक्तिक टीका न करता संघटनेच्या विकासासाठीचे आपले विचार, अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची भूमिका आणि भविष्यातील दिशा यावर प्रचार केंद्रित ठेवला.

मतदानानंतर रविंद्र गोसावी आणि रमेश जासूद यांनी एकत्र बसून संवाद साधला. निकाल जाहीर होण्यापूर्वी दोघेही हातात हात घालून सभागृहात दाखल झाले. निकालानंतर रविंद्र गोसावी व संतोष डफळ यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश जासूद व सचिव शांतराम पाडळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“हा माझा नाही, संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी परिवाराचा विजय”
“माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू-भगिनींचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. हा विजय माझा वैयक्तिक नसून संपूर्ण परिवाराचा आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या हक्कासाठी, सेवाविषयक प्रश्नांसाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. संघटनेला अधिक सक्षम, एकसंघ आणि प्रभावी बनविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन.” — रमेश संभाजी जासूद, नवनिर्वाचित अध्यक्ष, शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना


मतभेद असू शकतात; मनभेद नसावेत, हा आदर्श या निवडणुकीने घालून दिला. निवडणूक संपली, पण सहकार्य, मैत्री आणि संघटनेच्या हितासाठी एकत्र काम करण्याचा संदेश देणारी ही लढत शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या इतिहासात आदर्श निवडणूक म्हणून स्मरणात राहील.
