शंकर, श्रीराम, गणपतींना मानू नका, मूर्तींचे विसर्जन करा…” वादग्रस्त भाषणाने धार्मिक भावना दुखावल्या
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील कल्याणी फाटा परिसरातील एका इमारतीमध्ये बेकायदेशीररीत्या प्रार्थना सभा भरवून हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८:१० वाजण्याच्या सुमारास कल्याणी फाटा येथील विपुल कार्ले यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. तेथे लाऊडस्पीकरवर ख्रिश्चन धर्मीयांची प्रार्थना व भाषण सुरू असल्याची माहिती स्थानिक रहिवासी हरिभाऊ प्रकाश शिवले (रा. वढू बुद्रुक) यांनी मित्र किरण रामदास गव्हाणे (रा. कोरेगाव भिमा) यांना फोनवरून दिली.
माहिती मिळताच किरण गव्हाणे यांच्यासह गणेश गव्हाणे, ओमसाई देवकर, संतोष मायने, करण गव्हाणे व मेघराज गव्हाणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
धार्मिक चिथावणी अन् वादग्रस्त विधाने! तक्रारदार व त्यांचे सहकारी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले असता, तेथे उपस्थित लोकांना एक इसम धार्मिक प्रवचन देत होता. त्या वेळी तो लाऊडस्पीकरवरून जाहीरपणे असे बोलत होता:या जगामध्ये फक्त एकच ईश्वर आहे, तो म्हणजे येशू! इतर कोणत्याही देवाला आम्ही मानत नाही. सुख हवे असेल तर मूर्तीपूजा करू नका. शंकर, श्रीराम, गणपती यांना मानू नका व त्यांच्या मूर्तींचे विसर्जन करा.
हिंदू देवी-देवतांचा अनादर करणारे आणि मूर्तीपूजेविरुद्ध भडकावणारे हे भाषण ऐकून उपस्थित तरुणांनी संबंधित वक्त्याला जाब विचारला व त्याचे नाव-पत्ता विचारला. त्याने आपले नाव मनिष किसन काजळे (वय ३१, सध्या रा. केसनंद, ता. हवेली; मूळ रा. रामाखेडा कला, ता. कतनार, जि. बुरहानपूर) असे सांगितले.
अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हिंदू धर्मीयांच्या आराध्य देवतांबद्दल अपशब्द वापरून, मूर्तीपूजेचा निषेध करत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदार किरण गव्हाणे यांनी केला आहे.
त्यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी मनिष काजळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. पण हिंदू धर्मातील देवतांच्या विषयी चुकीची विधाने करून धार्मिक भावना दुखावणे हे निंदनीय आहे.
