शिरूर तालुक्यात गोळीबार ! करडे घाटात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

पुण्यातील शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून झालेल्या भीषण गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विशाल काळे असे मृत झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरमधील करडे घाट परिसरात संध्याकाळच्या सुमारास दोन गुन्हेगारी गट आमनेसामने आले. त्यांच्यात जुन्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूच्या कारने एकमेकांचा पाठलाग करत जोरदार धडक दिली. कारची समोरासमोर धडक झाल्यानंतर आरोपी सनी यादव याने विशाल काळे याच्यावर बेछूट गोळीबार केला. सनीने विशालवर चार राऊंड फायर केले आणि त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विशालच्या डोक्यात दगड घालून त्याची क्रूरपणे हत्या केली.

या घटनेला पूर्ववैमनस्याची मोठी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी शिरूरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या झालेल्या हत्याकांडात मृत विशाल काळे आणि सनी यादव हे दोघेही आरोपी होते. दोन दिवसांपूर्वीच ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. त्यानंतर आज अचानक करडे घाटात हा रक्ताळलेला खेळ झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर फरार झालेला मुख्य आरोपी सनी यादव याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!