पाबळ रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर, कुंपणच खातंय शेत, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ तर आरोग्यसेवा ‘रामभरोसे’! 

Swarajyatimesnews

जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या अचानक पाहणीत धक्कादायक वास्तव; डॉक्टर अनुपस्थित, रुग्णालयाची डी पी गायब, सरकारी खोल्या भाड्याने दिल्याने खळबळ

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा प्रमुख आधार असलेले पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालय आज स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर आले आहे. ‘कुंपणच शेत खात असल्यासारखा’ धक्कादायक कारभार येथे सुरू असून, जबाबदार अधिकारीच कर्तव्यावरून अनुपस्थित असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ मांडला गेला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी गुरुवारी या रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली असता येथील गंभीर अनागोंदी चव्हाट्यावर आली.

गुरुवारी दुपारी रुग्णालयात रुग्णांची मोठी वर्दळ असताना जि. प. सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी अचानक येथे भेट दिली. यावेळी रुग्णालयाच्या अनेक विभागांमध्ये कमालीची अस्वच्छता आढळून आली. उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. धक्कादायक बाब म्हणजे, कर्तव्यावर असणारे काही डॉक्टर आणि जबाबदार अधिकारी यावेळी अनुपस्थित होते. काही डॉक्टर गेल्या महिनाभरापासून नियमित येत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयांचा महागडा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

सरकारी रूम भाड्याने अन् ‘डीपी’ चोरीचे गूढ! – या पाहणीदरम्यान रुग्णालयातील काही धक्कादायक बाबी समोर आल्या. रुग्णालयाची विद्युत डीपी (DP) तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेली आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस पोलीस तक्रार झाली नसल्याचा दावा स्थानिकांनी केला. एवढेच नव्हे तर, रुग्णालयाच्या सरकारी खोल्या (रूम) कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांकडून महिन्याकाठी सुमारे २,५०० रुपयांनी बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्या जात असल्याची उलट-सुलट चर्चाही येथे रंगली होती. या सर्व प्रकारांमुळे रुग्णालय कल्याण समितीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ही समिती बरखास्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या अचानक पाहणीच्या वेळी ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाधिकारी सतीश साकोरे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मैड,  बाबा इनामदार, प्रतीक पिंगळे, विशाल जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

“रुग्णालय कल्याण समिती नेमकी करते तरी काय? ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना जबाबदार कोण?” — संतप्त नागरिक

गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ अजिबात सहन केला जाणार नाही – प्रफुल्ल शिवले

गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ अजिबात सहन केला जाणार नाही – प्रफुल्ल शिवले “ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. रुग्णालयातील अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रूम भाड्याने देण्याचे गंभीर आरोप या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर आरोग्य विभागाने तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”— प्रफुल्ल शिवले, जिल्हा परिषद सदस्य, केंदुर पाबळ जिल्हा परिषद गट.

  • रुग्णालयात आढळलेले प्रमुख मुद्दे :
  • डॉक्टरांची दांडी:महत्त्वाच्या वेळी जबाबदार अधिकारी व डॉक्टर अनुपस्थित.
  • अस्वच्छतेचे साम्राज्य:रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा.
  • सुविधांचा अभाव:औषधोपचारासाठी रुग्णांना तासनतास करावी लागणारी प्रतीक्षा.
  • तीन महिन्यांपासून डीपी चोरीचा तपास रखडला? 
  • सरकारी खोल्या कर्मचाऱ्यांनाच भाड्याने दिल्याचा संशय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!