विद्याधाम प्रशालेच्या १९८७ दहावी बॅचचा चौथा वर्धापन दिन ‘मोराची चिंचोली’ येथे उत्साहात साजरा!

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

शिक्रापूर येथील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या विद्याधाम प्रशालेच्या इयत्ता दहावी १९८७ बॅच परिवाराचा चौथा वर्धापन दिन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा झाला. २२ मे २०२२ रोजी या बॅचचे पहिले ऐतिहासिक ‘गेट-टुगेदर’ झाले होते, तेव्हापासून दरवर्षी हा परिवार आपला वर्धापन दिन एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेने साजरा करतो.

​या वर्षी या स्नेहसंमेलन आणि वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र, मोराची चिंचोली’ या निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमात १९८७ परिवारातील पुरुष आणि महिला सदस्य राज्यभरातून मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

​योगासने आणि वयाच्या पन्नाशीनंतरच्या आरोग्यावर मार्गदर्शन

​कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर आणि नेटके प्रास्ताविक करून झाली. यानंतर बदलत्या जीवनशैलीत आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विशेष सत्र घेण्यात आले. यामध्ये योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन (ध्यान) यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगून, सर्वांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.

“वर्तमानात आनंदी कसे राहावे?” आणि “वयाच्या पन्नाशीनंतर स्वतःच्या आरोग्याची व मनाची काळजी कशी घ्यावी?” या विषयावर तज्ज्ञ सदस्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि सोप्या भाषेत मांडणी केली, ज्याला उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.

​उपक्रमांचा आढावा आणि समाजोपयोगी संकल्प ​- या सोहळ्यात केवळ कौटुंबिक गप्पाच झाल्या नाहीत, तर परिवाराने सामाजिक बांधिलकी देखील जपली. गेल्या चार वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. मागील वर्षी घेतलेले संकल्प कसे पूर्ण झाले, याचे सादरीकरण करण्यात आले; तसेच आगामी वर्षामध्ये अधिक प्रभावी आणि नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्याचा सामूहिक संकल्प या वेळी करण्यात आला.

​कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, १९८७ परिवारातील जे सदस्य आज या जगात नाहीत, अशा दिवंगत सदस्यांना अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहण्यात आली.

गायन आणि आठवणींनी सोहळा भावूक आनंदाच्या या सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत काही सदस्यांनी उत्कृष्ट गायन केले. मनोगत व्यक्त करताना अनेक माजी विद्यार्थ्यांचे कंठ दाटून आले होते. शालेय जीवनातील आठवणी, एकमेकांना लाभलेली सोबत आणि तब्बल ३ दशकांहून अधिक काळ टिकून असलेले हे मैत्र पाहून संपूर्ण सोहळा अतिशय भावना विवश करणाऱ्या वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!