राहू (ता. शिरूर) : राहू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ज्येष्ठ समाजसेवक आणि गावाच्या विकासासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले कै. स्वर्गीय दत्तात्रय महादू शिंदे (वय ८७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राहू गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
कै. दत्तात्रय शिंदे यांनी माजी सरपंच म्हणून कार्यरत असताना गावाच्या विकासाला प्राधान्य देत सामाजिक सलोखा, लोकसहभाग आणि जनसेवेची परंपरा जोपासली. शांत, संयमी, मनमिळावू आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. गावातील अनेक सामाजिक, धार्मिक आणि विकासकामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते माजी जिल्हा न्यायाधीश तुळशीराम कोल्हे यांचे दाजी, तसेच शिक्रापूर येथील व्यावसायिक रायबा शिंदे यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने गावाने एक ज्येष्ठ, अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
