सोनेसांगवी (ता. शिरूर ) पंचक्रोशीत तात्या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनेक लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे त्यांच्या मदतीसाठी नेहमी हसतमुखाने उभे असणारे ते सेवाभावी व्यक्तिमत्त्व विश्वनाथ उर्फ तात्या शंकर दाते (वय ५८) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सोनेसांगवी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
विश्वनाथ दाते हे गावात ‘तात्या’ या नावाने सर्वपरिचित होते. हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू व गोरगरीबांना मदतीचा हात देत त्यांना अडीअडचणीत मदत करत योग्य ते मार्गदर्शन. करत. चहा, नाश्ता आणि शक्य ती मदत करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या साध्या, मनमिळावू आणि मदतीच्या स्वभावामुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.
सामाजिक कार्याची आवड असलेल्या तात्या यांनी व्यवसायाबरोबरच समाजसेवेचे व्रत जपले. त्यांच्या निधनामुळे गावाने एक सेवाभावी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
