क्षणभर थांबले श्वास… पुरात वाहून गेलेले महादेव राऊत दीड तासांनी सुखरूप किनाऱ्यावर

Swarajyatimesnews

पोलिस हवालदार हेमंत कुंजीर यांच्या तत्परतेने एनडीआरएफ, ड्रोन व प्रशासनाची शोधमोहीम , ते पोहत किनाऱ्यावर येतील’… पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांचा विश्वास ठरला खरा

वढू बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वढू बुद्रुक ते चौफुला येथील रस्त्यावरील भराव पुन्हा एकदा वाहून गेला. गेल्या वर्षीही याच ठिकाणी भराव वाहून गेला होता. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने ठेकेदार आणि संबंधित शासकीय यंत्रणेच्या कामकाजावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या घटनेदरम्यान महादेव किसन राऊत हे पाण्याच्या टाकीजवळ असताना अचानक पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढल्याने ते पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकले. माहिती मिळताच प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पाण्याची पातळी वाढल्याने जेसीबीच्या इंजिनमध्ये पाणी शिरले आणि बचावकार्य अर्धवट थांबले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच महादेव राऊत यांनी धाडसाने पाण्यात उडी घेतली. मात्र, प्रचंड वेगाच्या प्रवाहामुळे ते वाहून गेले आणि काही क्षणांतच नजरेआड झाले.

यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. महसूल, पोलीस, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. नदीपात्रात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेण्यात आला; मात्र बराच वेळ त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

याचवेळी पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांनी उपस्थितांना धीर देत, “महादेव राऊत यांना उत्तम पोहता येते. ते कोणत्याही परिस्थितीत पोहत किनाऱ्यावर येतील,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांचे शब्द अखेर खरे ठरले.

जवळपास दीड तासांच्या थरारानंतर महादेव राऊत कंपनी परिसराच्या बाजूने नदीचा किनारा गाठताना दिसले. त्यांना सुखरूप पाहताच प्रशासन, बचाव पथक आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेकांनी देवाचे आभार मानले, तर ग्रामस्थांनी राऊत यांचे अभिनंदन करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.

घटनेची माहिती मिळताच शिरूरचे नायब तहसीलदार स्नेहल गिरीगोसावी, मंडल अधिकारी गुलफाम शेख, ग्रामसेवक भाकरे, तलाठी रमेश घोडे, पोलिस हवालदार हेमंत कुंजीर व , प्रशासक सरपंच कृष्णा अरगडे, माजी सरपंच अनिल शिवले, माऊली भंडारे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे तसेच एनडीआरएफ शिक्रापूर पथक घटनास्थळी दाखल झाले. 

यावेळी पोलिस हवालदार हेमंत कुंजीर यांनी तातडीने संपर्क करत एन डी आर एफ व ड्रोन यांची व्यवस्था करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यावेळी सर्वांनी समन्वयाने बचाव आणि शोधकार्य राबवत मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी याच ठिकाणी रस्त्यावरील भराव वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदाराची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि येथे कायमस्वरूपी व सुरक्षित पर्यायी व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!