व्यापाऱ्यांना दिलासा! अडचणींवर तात्काळ उपाय; बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा

Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये व्यापाऱ्यांसाठी विशेष बैठक; खंडणीखोर, रोडरोमिओ आणि बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

“शिक्रापूरमधील व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा भीतीला बळी पडू नये. खंडणी, दमदाटी, धमक्या किंवा बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. व्यापाऱ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही,” असा ठाम विश्वास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केला.

व्यापारी असोसिएशन व विविध व्यापाऱ्यांच्या समन्वय बैठकीत यादव यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमण, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षा व इतर वाहने, भाजी विक्रेते, विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, विनापरवाना उभारलेले विद्युत खांब, पानटपऱ्या तसेच कंपन्यांच्या बसथांब्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर संबंधित विभागांच्या समन्वयाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर दबाव, खंडणीची मागणी किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास विलंब न करता थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करत निरीक्षक यादव यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिला. फोन किंवा संदेशाद्वारे आलेल्या प्रत्येक तक्रारीचा वैयक्तिक पाठपुरावा करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यादव यांनी परिसरातील चोरी रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष नियोजन करणे आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन २४ तास सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. त्यांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत पोलीस प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीस पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे, भाजप नेते पंढाभाऊ गायकवाड, निलेश राऊत, शरद टेमगिरे, प्रकाश चव्हाण, अतुल पानमंत, अंकुश घारे यांच्यासह परिसरातील अनेक व्यापारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!