वेळ नदीला प्रदूषणाचा विळखा? पुलावर दहा फूट फेसाचे ढीग; मानवी जीवन, शेती आणि पर्यावरण धोक्यात

Swarajyatimesnews

ग्रामपंचायतीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र; प्रदूषणाचा स्रोत शोधून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे परिसरातील वेळ नदीत सोमवारी रात्री निर्माण झालेल्या तब्बल दहा फूट उंच फेसाच्या ढिगाऱ्यांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. श्रीनाथ मंदिर–पांढरी वस्ती मार्गावरील पुलावर फेसाचा प्रचंड साठा झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली. ही घटना केवळ वाहतुकीची अडचण नसून वेळ नदीच्या प्रदूषणाचे गंभीर संकेत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

वेळ नदी ही परिसरातील हजारो एकर शेतीची जीवनवाहिनी आहे. भाजीपाला, ऊस, फळबागा आणि इतर नगदी पिकांचे सिंचन या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक गावांतील नागरिक, पशुधन, वन्यजीव, पक्षी आणि जलचरांचे जीवनही या नदीवरच अवलंबून आहे. अशा नदीत वारंवार मोठ्या प्रमाणावर फेस निर्माण होत असल्याने पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर नदीत प्रदूषित किंवा रसायनयुक्त सांडपाणी मिसळत असेल, तर त्याचे दूरगामी परिणाम शेती, जनावरे, पक्षी, भूजल, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी चेतन मारुती वाकळकर आणि प्रशासक सरपंच रोहिणी सद्दाम तोंडकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठविले आहे. या पत्रात वेळ नदीत वारंवार निर्माण होणाऱ्या फेसामुळे पर्यावरण, पाण्याची गुणवत्ता तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करून नदीतील पाण्याचे नमुने तातडीने तपासावेत, प्रदूषणाचा स्रोत शोधावा, जबाबदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि तपासाचा अहवाल ग्रामपंचायतीला सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. मात्र, अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेळ नदी वाचविण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भेसळीच्या रसायनांचा संबंध? नागरिकांमध्ये चर्चेला उधाणअनेक नागरिकांच्या मते, शिरूर तालुक्यात दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भेसळीसाठी वापरली जाणारी रसायने नदीत टाकली गेली असावीत, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या शक्यतेला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ज्या भागात मोठ्या प्रमाणावर फेस निर्माण झाला, त्या परिसरात सखोल तपास केल्यास या घटनेमागील धागेदोरे मिळू शकतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

वेळ नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असताना त्यात तब्बल दहा फूट उंच पांढरा फेस निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर, पशुधनावर, शेतीवर आणि पर्यावरणावर काय परिणाम होईल, याची चिंता आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाण्याची तपासणी करून हा फेस किंवा रसायन नेमके कुठून आले, याचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.” — रोहिणी सद्दाम तोंडकर, प्रशासक (सरपंच), ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!