शिक्रापुरात मध्यरात्री विहिरीत पडली महिला, पोलीस कर्मचाऱ्याची धाडसी उडी, आपदा मित्रांच्या मदतीने वाचले प्राण

Swarajyatimesnews

शिक्रापूर, ता. शिरूर : चाकण रोडलगत अथर्वनगर येथे रात्रीच्या सुमारास विहिरीत पडलेल्या महिलेला शिक्रापूर पोलीस आणि आपदा मित्रांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. रात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पोलीस शिपाई शरद धूरपते यांनी कोणतीही पर्वा न करता थेट विहिरीत उडी घेतली, तर पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे आणि आपदा मित्रांनीही विहिरीत उतरून महिलेला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

अथर्वनगर येथे काही युवक नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारण्याचे काम करत असताना रात्रीच्या शांततेत शेजारील विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. युवकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एक महिला पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आपदा मित्र आणि पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे, पोलीस शिपाई शरद धूरपते तसेच आपदा टीमचे अध्यक्ष राहुल गायकवाड, शेरखान शेख आणि अन्य आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस शिपाई शरद धूरपते यांनी थेट विहिरीत उडी घेतली. त्यानंतर पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे आणि आपदा मित्र शेरखान शेख यांनीही विहिरीत उतरून महिलेला बाहेर काढण्यासाठी मदत केली.

यावेळी अमोल नप्ते, राधेश्याम चव्हाण, गणेश तौर, शुभम सपकाळे, सिद्धेश डफळ, रवी जगताप, अनिकेत चकोर, सुमित भोगाडे, पवन माळी,महेश साबळे, गणेश टिळेकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात सहकार्य केले. अखेर महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या धाडसी आणि तत्पर बचावकार्याबद्दल शिक्रापूर पोलीस आणि आपदा मित्रांचे परिसरातून कौतुक होत आहे.

दहा मिनिटे उशीर झाला असता तर… शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. पवन सोनवणे यांनी दिली. महिलेच्या पायाला दुखापत झाली असून, ती रात्री केवळ दहा मिनिटे लवकर रुग्णालयात दाखल झाल्याने तिचा जीव वाचवता आला, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!