स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
सकाळची वेळ… शांतता… आणि कुरिअर कंपनीत शिरलेले तीन सराईत चोरटे! मात्र एका सतर्क कर्मचाऱ्याच्या हुशारीमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असून चोरांना आपली रिक्षा घटनास्थळीच सोडून पळ काढावा लागला. कोरेगाव भीमा येथील बालाजी कॉम्पलेक्समध्ये सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ही थरारक घटना घडली.
सीसीटीव्ही तोडले, लॉकर उघडले… पण! – ‘सँडोफॅक्स टेक्नॉलॉजी लि.’ या कुरिअर कंपनीचे शटर भल्या पहाटे ६:५७ च्या सुमारास उचकटून तीन अज्ञात भामट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी आत जाताच पकडले जाऊ नये म्हणून थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आणि रोकड असलेले लॉकर उघडले.
सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कंपनीचे डिलिव्हरी बॉय अजय गोंडे हे नेहमीप्रमाणे कामावर आले. शटर उचकटलेले आणि बाहेर संशयास्पद रिक्षा उभी असलेली पाहताच त्यांनी वेळ न दवडता पोलिसांना फोन लावला. बाहेर अजय गोंडे यांना फोनवर बोलताना पाहताच आत चोरट्यांचे धाबे दणाणले! पकडले जाण्याच्या भीतीने आतले दोन चोरटे थेट बाहेर पळाले, तर रिक्षात बसलेला चालक घाबरून रिक्षा (क्र. MH 12 QE 5948) घटनास्थळीच टाकून पसार झाला.
सुदैवाने कंपनीतील रोकड व सर्व पार्सल सुरक्षित आहेत. मॅनेजर महेश भोसले (वय ३२, रा. वाघोली) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात तीन भामट्यांवर गुन्हा दाखल केला असून, जप्त केलेल्या रिक्षाच्या आधारे चोरांचा माग काढला जात आहे.
