फाशीची शिक्षा सुनावताच चिमुकलीच्या आई-वडिलांचा आक्रोश; नराधम भीमराव कांबळे मान खाली घालून उभा
स्वराज्य टाईम्स प्रतिनिधी
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने “मरेपर्यंत फाशी” अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल देताना या गुन्ह्याला “रेअरेस्ट ऑफ रेअर” स्वरूपाचे प्रकरण ठरवत आरोपी समाजात वावरण्याच्या लायकीचा नसल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवले.(Nasarapur)
निकाल जाहीर होताच न्यायालयातील वातावरण भावनिक झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करणाऱ्या पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. न्यायालयातच त्यांनी धाय मोकलून रडत आपल्या मुलीला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. दुसरीकडे आरोपी भीमराव कांबळे मात्र संपूर्ण वेळ मान खाली घालून निःशब्द उभा होता.(Nasarapur)
न्यायालयाने १३७ पानी निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयातील विविध महत्त्वाच्या निर्णयांचा संदर्भ देत शिक्षेचे कारण स्पष्ट केले. बच्चन सिंह, अशरफ अली तसेच वसंत धुपारे विरुद्ध महाराष्ट्र शासन यांसारख्या प्रकरणांचा उल्लेख करत आरोपीविरुद्ध कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.(Nasarapur)
यापूर्वी २६ जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. अंतिम युक्तिवादादरम्यान आरोपीने मुलीला घेऊन जाताना घसरल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि अन्य साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला दोषी ठरवले.(Nasarapur)
६५ वर्षीय भीमराव कांबळे याने खाऊचे आमिष दाखवून साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला एका गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात बालिकेच्या शरीरावर १९ जखमा आढळल्या होत्या. तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या वैद्यकीय आणि अन्य पुराव्यांमुळे गुन्ह्याचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी बालिकेला घेऊन जात असल्याचेही स्पष्ट दिसून आले होते.(Nasarapur)
या निकालामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळलेल्या या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, बालकांवरील अत्याचारांविरोधात कठोर संदेश देणारा हा निर्णय मानला जात आहे.(Nasarapur)
