पहिल्याच दिवशी ५५० बालकांना पोलिओचे डोस; घराघरांत लसीकरणाचे आवाहन
प्रतिनिधी राजाराम गायकवाड
ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर येथे रविवारी (दि. २८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा विधीपूर्वक शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती शिरूरचे उपसभापती रामभाऊ सासवडे आणि शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेडे, डॉ. कदम, रुग्णालयीन अधीपरिचारिका श्रीमती खान, श्रीमती जाधव तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिमेची गुणवत्ता, नियोजन आणि अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण पथकाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरी जाधव आणि त्यांचे पथकही उपस्थित होते. त्यांनी लसीकरण केंद्राची तपासणी करून कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी पोलिओमुक्त भारतासाठी प्रत्येक पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचा डोस देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आणि घराघरांत जाऊन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील बुथवर एकूण ५५० बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. पुढील टप्प्यात आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन उर्वरित पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
