राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक सज्ज; वाघोलीत NEP-2020 व बदल व्यवस्थापनावर मार्गदर्शन
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
रोटरी क्लब ऑफ कोथरूड, पुणे आणि भारतीय जैन संघटना (बीजेएस) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020) आणि ‘चेंज मॅनेजमेंट’ (बदल व्यवस्थापन) या विषयावर शिक्षक-प्रशिक्षण संवाद व परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. शिक्षकांना बदलत्या शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत अध्यापन पद्धती आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरला.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कोथरूडच्या अध्यक्षा रोटेरियन वंदना दांडेकर, रोटेरियन उज्ज्वल तावडे, रोटेरियन उर्मिला हळदणकर, रोटेरियन रश्मी पटवर्धन, रोटेरियन वसंत कुलकर्णी, रोटेरियन सुहास पटवर्धन, रोटेरियन हेमचंद्र तावरे यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, उपप्राचार्य पोपटराव मगेठे, प्रा. विष्णू देवडकर, प्रा. विजय अंधारे, प्रा. गणेश क्षीरसागर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, अध्यापनातील बदल, शिक्षकांची बदलती भूमिका आणि प्रभावी बदल व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रातून शिक्षकांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले.
रोटेरियन रश्मी पटवर्धन यांनी NEP-2020 मुळे शिक्षण क्षेत्रात होणारे बदल शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविकात प्राचार्य संतोष भंडारी यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती देत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा शितोळे यांनी केले, तर प्रांजली ठुबे यांनी आभार मानले. शिक्षकांसाठी हा प्रशिक्षण संवाद प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
