हे बाळ जगलं पाहिजे… जन्मदात्यांनी टाकलेल्या बेवारस चिमुकल्यासाठी शिक्रापूर पोलीस ठरले देवदूत

Swarajyatimesnews

कर्तव्य आणि माणुसकीचा वेळ नदीकाठी सुरेख संगम; शिक्रापूर पोलिसांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

जन्म देणाऱ्यांनीच निर्दयीपणे वेळ नदीकाठी बेवारस अवस्थेत टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला शिक्रापूर पोलिसांनी, सजग नागरिकांनी आणि डॉक्टरांनी अक्षरशः नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. कर्तव्य, संवेदनशीलता आणि माणुसकीचा दुर्मिळ संगम अनुभवायला लावणाऱ्या या घटनेमुळे खाकीतील मायेचा चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आला असून, संपूर्ण परिसरातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिक्रापूर येथील वेळ नदी परिसरात पूजेसाठी गेलेले सुरेश करंजे यांना नदीकाठी एका चिमुकल्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, नवजात अर्भक बेवारस अवस्थेत पडलेले दिसून आले. हे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी तात्काळ सचिन करंजे आणि सर्पमित्र शेरखान शेख यांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच शेरखान शेख यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्याशी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर मिनाक्षी करंजे यांच्या मदतीने त्या अर्भकाला त्वरित शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख आणि पोलीस पथकाने रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

रुग्णालयात डॉ. शहाजी कदम, डॉ. पराग कानडे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अर्भकावर तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अर्भकाची प्रकृती स्थिर झाली. “हे बाळ पूर्णपणे सुदृढ आहे,” असे डॉक्टरांनी सांगताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या अर्भकाला बालकल्याण समितीच्या माध्यमातून पुण्यातील भारतीय समाज सेवा संस्थेत दाखल केले. मात्र या प्रवासातही पोलिसांनी दाखवलेली माया, जिव्हाळा आणि संवेदनशीलता अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली. या चिमुकल्याला पुण्यात रवाना करताना पोलिसांच्या वाहनाची विशेष सजावट करण्यात आली होती. नवीन कपडे, आवश्यक वस्तू आणि मायेची ऊब देत त्या अर्भकाला सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.

“खाकी फक्त कायद्याची नसते, ती मायेचीही असते,” याचा प्रत्यय देणाऱ्या या घटनेमुळे शिक्रापूर पोलिसांविषयीचा आदर आणखी वाढला आहे. समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून देणारी ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली, पण त्याचवेळी आशेचा आणि संवेदनशीलतेचा नवा किरणही देऊन गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!