सविता पऱ्हाड व ग्रामस्थांच्या पुढाकाराने परिसर भक्तीमय
प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिरूर तालुक्यातील पऱ्हाडवाडी (केंदूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘श्रीमद भागवत कथा’ ज्ञानयज्ञामुळे संपूर्ण परिसर सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्याला केंदूरसह करंदी, पिंपळे-जगताप, पाबळ, धामारी आणि परिसरातील गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत असून, कथा स्थळी दररोज भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
श्रीजीधामचे ख्यातनाम कथा प्रवक्ते संतोषानंदजी शास्त्री यांच्या रसाळ, ओजस्वी आणि सुश्राव्य वाणीतून श्रीमद भागवत कथेचे निरूपण होत आहे. त्यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध होत असून, धार्मिक वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला आहे. राधेश्यामजी सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट सांगीतिक साथसंगतीमुळे या कथा सोहळ्याची रंगत आणखी वाढली आहे.
या पाच दिवसीय ज्ञानयज्ञात विदूर-ध्रुव आख्यान, अजामेळ-प्रल्हाद आख्यान, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन लीला, रासलीला, रुक्मिणी स्वयंवर, सुदाम चरित्र आणि परीक्षित मोक्ष यांसारख्या विविध धार्मिक कथांचे प्रभावी सादरीकरण होत असून, प्रत्येक दिवशी भक्तिमय वातावरणात भाविक तल्लीन होत आहेत.
या धार्मिक सोहळ्यास माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्या वंदना पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत उपस्थिती दर्शविली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिरूर पंचायत समितीच्या माजी उपसभापती सविताताई पऱ्हाड, माजी सरपंच तथा उद्योजक प्रमोदसाहेब पऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र केंदूर (पऱ्हाडवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने उभारलेला हा भक्तिमय सोहळा परिसरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.
“धर्म, संस्कार आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या कथा श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा,” असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
