Aggreko India : फुलगावचा जागतिक औद्योगिक नकाशावर उदय! ‘ॲग्रेको इंडिया’ उभारणार ४०० कोटींचे महाकाय केंद्र

Swarajyatimesnews

उद्योगवाढीसाठी ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील : जि. प. सदस्य, किरण साकोरे

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला कमालीची गती देणारी एक अत्यंत मोठी आणि अभिमानास्पद घडामोड समोर आली आहे. ऊर्जा आणि तापमान नियंत्रण क्षेत्रातील जगातील आघाडीची महाकाय कंपनी ‘ॲग्रेको इंडिया’ ही पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे तब्बल ४०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पासाठी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सरकार आणि कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

या करारानुसार पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे कंपनीचे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्कॉटलंडबाहेरील ‘ॲग्रेको’ कंपनीचे हे जगातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे स्वागत करताना सांगितले की, पुणे आता जागतिक स्तरावर ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’चे महत्त्वाचे केंद्र बनत असून या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना राज्य शासनाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या, मंजुरी आणि प्रशासकीय बाबतींमध्ये पूर्ण सहकार्य केले जाईल.

ॲग्रेको कंपनीचा हा प्रकल्प प्रामुख्याने शाश्वत तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे यावर आधारित असणार आहे. राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याला पूरक ठरणाऱ्या तापमान नियंत्रण प्रणालींच्या प्रसारासाठी कंपनी विशेष काम करणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील अत्याधुनिक उत्पादन आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्राला मोठी ताकद मिळणार असून, स्थानिक पुरवठा साखळी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

या कराराच्या वेळी समूह वाणिज्य संचालक सन्नी ठकरार, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे, स्टीफन रेआ, सुनील देशमुख, ब्रिटिश हाय कमिशनचे मार्क बिरेल आणि प्रतीक्षा क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या गुंतवणुकीमुळे फुलगाव आणि परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

उद्योगवाढीसाठी ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील : किरण साकोरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार आभारी असून फुलगाव भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाची औद्योगिक गुंतवणूक येणे ही संपूर्ण परिसरासाठी भाग्याची गोष्ट असून या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना  रोजगारासह आर्थिक प्रगतीची नवी कपाटे उघडली जातील, असा विश्वास आहे.तसेच फुलगाव आणि परिसरातील नागरिक नेहमीच विकासाभिमुख राहिले असून, या नव्या महाकाय उद्योगाच्या वाढीसाठी आणि येथील सुरक्षित, पोषक वातावरणासाठी ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील हा विश्वास आहे. – किरण साकोरे , सदस्य पुणे जिल्हा परिषद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!