उत्सव करा, दहशत नको! कोरेगाव भिमातील गणेश मंडळांना पोलिसांचा कडक इशारा

Swarajyatimesnews

 कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा

उदयकांत ब्राम्हणे 

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, डीजेच्या अमर्यादित आवाजाला आळा घालण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.

कोरेगाव भीमा येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी गावातील सुमारे २९ गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, वाहतूक सुरळीत करणे, महिलांची सुरक्षितता आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी राजेंद्र गवदे यांनी डीजे बंदी करण्यात यावी, अशी मागणी केली. उत्सव धार्मिक व आनंदाचा असावा, त्याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये आणि कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

“चुकीचे असेल त्याला थारा नाही. कायदा हातात घेणाऱ्याची हयगय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.

गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे पावित्र्य जपावे, मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच मंडळात मुक्कामी राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. मंडळांनी सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे साकारावेत, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि मंडप परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले.

गणेशोत्सव काळात महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी परिसरातील पाच शाळांना भेटी देऊन विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेबाबतही जनजागृती केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, बाजारपेठेतील चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याबरोबरच मोबाईल चोरी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना, स्पीकरच्या वापरावर नियंत्रण, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बॅरिकेडिंग, ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्रिय करणे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी वाढविण्यात येणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

बैठकीस पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलिस हवालदार श्रावण गुपचे, एन. पी. सुद्रिक, होले आदी उपस्थित होते. सरपंच अनिकेत गव्हाणे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, सत्यनारायण ढेरंगे, संपत गव्हाणे यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सव भक्तीचा, आनंदाचा आणि सामाजिक प्रबोधनाचा व्हावा; ध्वनीप्रदूषण, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!