टँकरसाठी नागरिकांची कसरत
गतवर्षी झालेला अल्प पाऊस, उन्हाच्या वाढत्या तीव्र झळा, आटलेले पाणवठे, ओढे-नाले आणि विहिरींनी गाठलेल्या तळा यामुळे शिरूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ परिसरातील गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या पाबळ व कान्हूर मेसाई या गावांची तहान पूर्णपणे शासकीय टँकरवर अवलंबून असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याच धर्तीवर आता हिवरे व केंदूर या गावांतूनही टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी ‘जलजीवन मिशन’सह इतर पाणीपुरवठा योजनांची कामे रखडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पुढील काळात ही टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून टँकरची संख्या वाढवावी, जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करावीत आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
टँकर मंजुरीच्या किचकट प्रक्रियेमुळे अडचणी; दोन गावांचे प्रस्ताव रखडले – केंदूर आणि हिवरे या गावांसाठी टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून, ते मंजुरीसाठी तहसीलदार यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. टँकर मंजुरीची प्रक्रिया अत्यंत किचकट असून, प्रथम ग्रामपंचायतीकडून पंचायत समिती, तिथून तहसील आणि शेवटी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव जातो. त्यांच्या आदेशानंतरच गावात टँकर सुरू होतो.
शिरूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये जर लवकर पाऊस आला नाही, तर टँकरची मोठी गरज भासणार आहे. परंतु, हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवावे लागत असल्याने टँकर सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हे टँकर प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार पंचायत समिती किंवा तहसीलदार स्तरावरच देण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दृष्टिक्षेपात तालुक्यातील पाणी परिस्थिती –
सुरू असलेले टँकर: ०९, मागील वर्षीचे टँकर: १२, प्रस्तावित टँकर:०३
तालुक्यातील एकूण पाण्याचे स्रोत: कूपनलिका (बोरवेल): १७७७,शासकीय विहिरी:१५९, नळ पाणी पुरवठा योजना:१३४, पाझर तलाव: ७३
पाणी योजनांची सद्यस्थिती: गावठाणांसाठी ग्राम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सध्या पाणी पुरवठा सुरू आहे.थिटेवाडी बंधाऱ्यातील पाणीसाठ्याने तळ गाठल्यामुळे येथील पाणीयोजना पूर्णपणे बंद पडली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’मार्फत सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे निधी अभावी अपूर्ण अवस्थेत आहेत.
“पाबळ व कान्हूर मेसाई गावांसाठी पाण्याचे टँकर सुरू करण्याला उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून सध्या तेथे टँकर सुरू आहेत. केंदूर व हिवरे गावासाठीचे मागणी प्रस्ताव प्राप्त झाले असून, ते मंजुरीसाठी तहसीलदार यांच्यामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास आवश्यकतेनुसार तत्काळ पाण्याचे टँकर सुरू केले जातील. असे मत शिरूरचे गट विकास अधिकारूबमहेश डोके यांनी सांगितले.
