धक्कादायक ! पेरणे फाट्यावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, कचरा टाकत नागरियांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Swarajyatimesnews

पेरणे फाटा (ता. शिरूर) : येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला लागूनच असलेल्या दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कचरा डेपोमध्ये बाहेरील कंपन्यांचा घातक रासायनिक आणि औद्योगिक कचरा बेकायदेशीरपणे आणून तो सर्रासपणे जाळला जात आहे. या कचऱ्यातून निघणाऱ्या प्रचंड विषारी धुरामुळे संपूर्ण परिसरात लोकांचा श्वास गुदमरत असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने दोन दिवसांत यावर कठोर कारवाई केली नाही, तर थेट पुणे-नगर महामार्गावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा संतप्त इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते समाधान बबन माने यांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. विना नंबर वाहनांमधून हा व्यावसायिक व रासायनिक कचरा रात्री-अपरात्री या वस्तीच्या हद्दीत आणून टाकला जातो आणि तो पेटवून दिला जातो, असे या तक्रारीत म्हटले आहे. या विषारी धुरामुळे स्थानिक दलित वस्तीमधील लहान मुले, वृद्ध यांच्या आरोग्याचा प्रश्न तर गंभीर झाला आहेच, शिवाय ऐतिहासिक विजयस्तंभाच्या दर्शनासाठी येणारे लाखो अनुयायी आणि तेथे बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस बांधवांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

यापूर्वी स्थानिक लोणीकंद पोलीस ठाणे आणि पेरणे ग्रामपंचायतीकडे लेखी दाद मागूनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याचे माने यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या याच उदासीनतेमुळे कचरा माफियांचे धाडस वाढले असून, या प्रकरणात संबंधित दोषी व्यक्तींवर पर्यावरण कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी करावी, हवेची शुद्धता तपासावी आणि हा अनधिकृत कचरा डेपो तात्काळ लोकवस्तीतून दुसऱ्या ठिकाणी हलवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने दोन दिवसांत पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा संताप महामार्गावर उतरेल, अशी चिघळलेली परिस्थिती पेरणे फाट्यावर निर्माण झाली आहे.याबाबत  दिपक वाघमारे यांना ग्राम पंचायतीने नोटीस बजावली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

सदर कचरा घरचाच असून अनेक दिवसांपासून तो पडून होता. त्याजागी काम करायचे असल्याने तेथे टाकण्यात आला.यामागे इतर कोणताही उद्देश नाही. – दिपक वाघमारे

कंपन्यांचा कचरा स्वतःच्या फायद्यासाठी दलीत वस्तीत आणून टाकून जाळत आमच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. – समाधान बबन माने , नागरिक

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणे अत्यंत चुकीचे आहे. संबंधितांना ग्राम पंचायतीच्या वतीने नोटीस देण्यात आली  असून संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. – सरपंच उषा दशरथ वाळके, पेरणे ग्राम पंचायत 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!