धक्कादायक! तळेगाव ढमढेरे येथे मंदिरांसह घरे व किराणा मालाचे दुकान लुटले; ४ मास्कधारी चोरांचा थरार CCTV मध्ये कैद!

Swarajyatimesmews

 श्वान पथकाकडून चोरांचा माग सुरू; पोलिसांच्या ‘वचका’वर गावकऱ्यांचे गंभीर प्रश्नचिन्ह

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर): तालुक्यातील ऐतिहासिक आणि शांत मानल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे गावात काल रात्री चोरांनी उच्छाद मांडला. गावातील प्रसिद्ध शनी मंदिर आणि दत्त मंदिराच्या दानपेट्या फोडून दक्षिणेचे पैसे लंपास करण्यात आले, तर तीन बंद घरांसह एक किराणा मालाच्या दुकानाचे कुलूप तोडून धाडसी चोरी करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, “आता मंदिरेही सुरक्षित राहिले नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.या प्रकरणी स्थानिक नागरिक वैभव पाठक यांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.

नागरिक जागे झाले अन् चोरांनी ठोकली धूम ! – मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास तोंडाला मास्क गुंडाळलेले चार सराईत चोरटे हत्यारांसह गावात दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम शनी मंदिर आणि दत्त मंदिराला लक्ष्य करत येथील दानपेट्या फोडल्या. दानपेट्या फुटल्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे नागरिक तात्काळ जागे झाले. नागरिकांनी आरडाओरडा करताच चोरांनी तेथून पळ काढला. मात्र, पळण्यापूर्वी चोरांनी परिसरातील दोन बंद घरांचे कुलूप तोडून आतही हात साफ केला. चोरांच्या या सर्व हालचाली आणि पळ काढतानाचा थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.चोरांनी छोट्या आकाराचे गॅस कटरचा वापर करत चोरी केली.

 सदर चार चोरांनी किराणा मालाचे दुकान फोडत त्यातील खाद्य पदार्थ खाल्ले यामध्ये त्यांनी आइस्क्रीम खात दुकानाच्या गल्ल्यावर डल्ला मारला.

श्वान पथक दाखल; तपासाला गती – घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वान पथक (Dog Squad)आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली. CCTV फुटेज आणि श्वान पथकाच्या मदतीने चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

पोलिसांचा वचक संपलाय का? नागरिकांमध्ये भीती आणि संताप –  या धाडसी चोऱ्यांमुळे तळेगाव ढमढेरे येथील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. मंदिरात घुसून देवाचा ऐवज पळवण्यापर्यंत चोरांची हिंमत वाढल्याने स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर आणि रात्रीच्या गस्तीवर (Patrolling) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक उरला आहे की नाही? – असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. आता पोलीस या मास्कधारी चोरांना तातडीने गजाआड करणार की नागरिकांना आणखी चोऱ्यांच्या छायेत जगावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!