भावडीत महसूल विभागाची ४२२ ब्रास अवैध उत्खननावर धडक कारवाई

Swarajyatimesnews

दोन वाहने ताब्यात, पोकलॅन्डही रडारवर

हवेली तालुक्यातील भावडी परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत सुमारे ४२२ ब्रास गौण खनिजाचा पंचनामा केला आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाईसाठी ती पेरणे फाटा पोलीस चौकी येथे जमा करण्यात आली आहेत. बेकायदेशीर अवैध गौण खनिज वाहतूक करताना लोणीकंद मंडल अधिकारी संदिप झिंगाडे, महसूल अधिकारी गरकर संजय, माधव बिराजदार, अभिजित जोशी व सहकाऱ्यांनी जप्त कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २२ जून) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भावडी परिसरातील खाणीत ब्लास्टिंग करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी (दि. २४ जून) या ब्लास्टिंगमधून निघालेले गौण खनिज पोकलॅन्ड मशीनच्या साहाय्याने वाहनांमध्ये भरून वाहतूक केली जात असल्याची माहिती लोणीकंदचे मंडलाधिकारी संदीप झिंगाडे यांना मिळाली.

माहिती मिळताच झिंगाडे यांनी तातडीने महसूल विभागाचे पथक घेऊन घटनास्थळी कारवाई केली. पाहणीदरम्यान सुमारे ४२२ ब्रास गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित जागेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून उत्खननासाठी वापरण्यात आलेल्या पोकलॅन्ड मशीनचाही शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

साठेबाजांवर कारवाईची मागणी – महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, बेकायदेशीररीत्या काढलेले गौण खनिज विविध ठिकाणी साठवून ठेवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशा साठेबाजांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

“भावडी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ४२२ ब्रास गौण खनिजाचा पंचनामा करण्यात आला आहे. संबंधित गौण खनिज शासनाच्या ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणातील संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व शासनाच्या प्रचलित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस कोणतीही मुभा दिली जाणार नाही.” — संदीप झिंगाडे, मंडलाधिकारी, लोणीकंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!