स्वराज्य टाइम्स न्यूज
पुण्यातील खराडी परिसरातील भनगाई वस्तीत एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाच्या टोकातून एका पतीने आपल्या पोटच्या मुलांसमोरच पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पहाटेच्या सुमारास पत्नी गाढ झोपेत असताना पतीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि एवढ्यावरच न थांबता तिचे कान आणि नाकही कापून काढले. या रक्ताळलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Kharadi Pune Murder Case)
किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्याविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३) याने या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.(Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दयाराम हा एका खाजगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी किरण ही खराडी परिसरातील घरांमध्ये घरकाम करून कुटुंबाला हातभार लावत होती. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, आरोपी दयाराम याला दारूचे प्रचंड व्यसन होते. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात सतत गंभीर स्वरूपाचे कौटुंबिक वाद होत होते.(Husband Kills Wife in Kharadi)
बुधवारी (२४ जून) पहाटे चारच्या सुमारास किरण ही आपल्या मुलांच्या शेजारी गाढ झोपलेली होती. याच वेळी दारूच्या नशेत आणि वादाच्या रागात अंध झालेल्या दयारामने घरात असलेल्या तीक्ष्ण शस्त्राने थेट किरणच्या गळ्यावर वार केले. हा हल्ला एवढा अमानुष होता की, त्याने किरणचे नाक आणि कानही शस्त्राने कापून काढले. किरणच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी झोपलेली मुले जागी झाली. बहिणीवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याची माहिती मिळताच भाऊ दादू बोरसे याने तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किरणला रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.(Kharadi Police Station)
घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातूनच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. घटनेनंतर आरोपी पती दयाराम बाबर हा फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधासाठी जंगजंग पछाडत आहेत. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव करत आहेत.(Pune Latest News)
